
अस्वच्छतेबाबत अधिकार्यांना झापले, गुत्तेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची तंबी
बीड (रिपोर्टर): बीडकरांच्या स्वप्नातलं विकासाचं प्रत्येक काम मार्गी लागणार असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आज भल्या सकाळी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कार्डीयाक कॅथलॅब युनिटचे लोकार्पन केले. यावेळी अजितदादांनी रुग्णालयातील कार्डियाक कॅथलॅबची पाहणी करताना तेथील दरवाजापासून भिंतीवरील प्लास्टर ते लाईट फिटींगपर्यंत बारकाईने लक्ष देत स्वच्छतेबाबत अधिकार्यांना झाप झापलं तर तेथील काम करणार्या गुत्तेदाराला चांगलं काम नाही केलं तर थेट ब्लॅकलिस्ट करिल असे अजित पवारांनी म्हटले.

आज सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे जिल्हा रुग्णालयामध्ये डेरेदाखल झाले. त्यांच्यासमवेत आ.धनंजय मुंडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. रुग्णालयामध्ये कार्डियाक कॅथलॅबचे लोकार्पन फित कापून अजितदादांनी केले. यावेळी अजितदादांनी तेथील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करत अधिकार्यांना चांगलेच झापले. एवढेच नव्हे तर दरवाजाच्या खिळ्यापासून भिंतीवरच्या प्लास्टरपर्यंत आणि लाईट फिटींग इथपर्यंत त्यांनी कामाच्या त्रूटी काढल्या. आता मी येतो टचअप करायला असं म्हणत काम करणार्या गुत्तेदाराला थेट ब्लॅकलिस्ट करण्याची तंबी दिली. यावेळी अजिदादा म्हणाले, बीडकरांचा स्वप्नातलं विकासाचं प्रत्येक काम मार्गी लावणार..!
आज जिल्हा रुग्णालय, बीड येथे कार्डियाक कॅथलॅब युनिटच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. काम चांगलं झालं पाहिजे आणि लोकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत हीच आमची मनापासून धारणा आहे. प्रत्येक जिल्ह्यात असे युनिट्स असणं गरजेचं आहे. ह्या जिल्हा रुग्णालयात उत्तम व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून जिल्हाधिकार्यांना गरजेनुसार आवश्यक त्या साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणं हा त्यांचा हक्क आहे. डॉक्टरांना भासणार्या अपुर्या सुविधांची पूर्तता प्राधान्यानं केली जाईल याची खात्री यावेळी दिली. बीडचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अहिल्यानगर ते बीड रेल्वे सेवा सुरू होत आहे. बीड ते पुणे रेल्वे सेवा देखील लवकरच सुरू होईल. आगामी काळात टप्प्याटप्प्यानं पुढे विमानतळ उभारणीसह आवश्यक सुधारणा बीडकरांना मिळाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्या त्रुटी आहेत, त्या सुधारल्या जातील आणि जेवढ्या सुविधा देता येतील त्या सर्व बीडकरांना नक्की दिल्या जातील.








