
श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये प्रिन्सिपलच्या राजीनाम्यावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन
बीड (रिपोर्टर): बीड शहरातील बार्शी रोडवरील श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल या नामांकित शैक्षणिक संस्थेत आज मोठा गोंधळ उडाला. शाळेच्या प्राचार्या अरोरा मॅडम यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या राजीनाम्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर ठिय्या देत आंदोलन केले. we want principal mam अशा घोषणांनी शाळा परिसर दणाणून गेला.
अचानक विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबल्यानंतर शाळेतील शिक्षक आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. पालक देखील कामधंदे सोडून शाळेकडे धावले. शाळेबाहेर मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला.विद्यार्थ्यांनी अरोरा मॅडम यांनी आपला राजीनामा परत घ्यावा, शाळेत पुन्हा रुजू व्हावे, अशी ठाम मागणी केली. जवळपास तीन तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान शिक्षण विभाग वा पोलिस प्रशासनाचा एकही प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचला नाही, ही बाब विशेष चर्चेचा विषय ठरली. शेवटी प्राचार्या अरोरा यांनी विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आंदोलन थांबले. तथापि, त्यांनी राजीनामा का दिला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
त्यांनी दबावाखाली राजीनामा दिला की स्वखुशीने, याविषयी अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, या शाळेचे संस्थापक पवार यांच्यावर काही महिन्यांपूर्वी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने शाळेच्या प्रतिमेवर मोठा परिणाम झाला आहे. या प्रकरणाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली होती. या पार्श्वभूमीवर प्राचार्यांच्या राजीनाम्यामुळे शाळेतील वातावरण अधिक तणावपूर्ण झाले आहे. आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. संस्थापक पवार हे सध्या बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले असून, पुढील निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणी बीड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांनी शाळेत भेट देऊन होत असलेला प्रकार समजून घेतला अणि तेथून संस्था चालक पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, एक महिन्यापूर्वीच प्राचार्यांनी राजीनामा दिला आहे, तो परवा मंजूर करण्यात आला असून येत्या दोन दिवसात याबाबत संस्था चालक निर्णय घेणार आहेत. संबंधित विद्यार्थी अणि पालकांची समजूत घालून आंदोलन मिटवण्यात अलो आहे.






