
सतीश पाटलांच्या मागे तलवार घेऊन लागला
घरातले पैसे, सोने पळविले
योगीराज नरवडे विरोधात गुन्हा

पिंपळनेर (रिपोर्टर): भाजपाचे बीड तालुकाध्यक्ष मनोज पाटील यांच्या पिंपळनेर येथील निवासस्थानी दगडफेक करत गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवत योगिराज विनोद नरवडे याने थेट मनोज पाटील यांचे वडील सतीश पाटील यांच्यावर हल्ला करण्याच्या हेतुने धावत गेला. त्यावेळी उपस्थित लोकांनी गर्दी केल्याने तो हल्ला टळला. मात्र योगीराज याने घरामधून कपाटातील नगदी 90 हजार रुपयांसह सहा तोळे सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना काल रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सतीश पाटील यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसात योगीरा नरवडे याच्या विरोधात कलम 309 (4), 333, 352, 351 (2), 125, 324 (4), सशस्त्र अधिनियम 1959 नुसार कलम 4, कलम 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील हे पिंपळनेर येथील रहिवासी असून सध्या त्यांच्या पत्नी या पिंपळनेरच्या सरपंच आहे तर वडील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेले आहेत. काल रात्री नऊच्या सुमारास सतीश पाटील हे आपल्या निवासस्थानी होते तर मनोज पाटील हे कामानिमित्त बीडला आलेले होते. अचानक घरावर दगडफेक सुरु झाल्याने घरामध्ये असलेले सतीश पाटील घाबरत घराबाहेरच्या पोर्चमध्ये आले. त्यावेळी योगीराज विनोद पाटील हा हातात लोखंडी पाईप आणि दुसर्या हातात तलवार घेऊन मला पाहताच मारण्याच्या उद्देशाने माझ्याकडे पळत आल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले. या वेळी त्याने शिवीगाळ करत घरामध्ये घुसून सामानाची तोडफोड केली. मी आरडाओरड केल्याने आसपासचे लोक जमा झाले. त्यावेळी योगीराज याने घरासमोरील मोटारसायकल, मिक्सर मशीन, घराच्या खिडक्यांवर दगडे मारून काचा फोडल्या आणि घरामधील सामानाची नासधूस करत कपाटातील नगदी नव्वद हजार रुपये व सहा तोळ्याचे सोन्याचे गंठण असा एकूण 3 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून तो फरार असल्याचे सांगण्यात येते. या घटनेने पिंपळनेरमध्ये खळबळ उडाली आहे.








