
पाच गावांच्या ग्रामस्थांचा रस्ता रोको
शेतकरी आंदोलनाला केजमध्ये हिंसक वळण
केज (सय्यद माजेद): कोरडेवाडी येथील साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा या मागणीसाठी चार ते पाच गावकर्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान आंदोलनकर्त्यांची प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त शेतकर्यांनी पाच बसेसवर दगडफेक केली. यामध्ये एक बसचालक जखमी झाला आहे.

कोरडेवाडीचा साठवण तलाव झाल्यानंतर तीन ते चार गावांचा पाणीप्रश्न मिटू शकतो. गावकर्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यापूर्वी अनेक वेळा प्रशासनाकडे तलावासंदर्भात निवेदन देण्यात आले मात्र याची दखल घेतली गेली नसल्याने आज गावकर्यांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं! या सह इतर घोषणांचे फलक घेऊन कोरडेवाडीसह परिसरातील गावकरी रस्त्यावर उतरले होते. गावकर्यांच्या घोषणांनी अवघा परिसर दणाणून गेला होता. दरम्यान आंदोलनाची दखल प्रशासन घेत नसल्याने संतप्त शेतकर्यांनी पाच बसेसवर दगडफेक केली. यात एक बसचालक जखमी झाला असल्याचे सांगण्यात येते. गंगाखेड-आळंदी (बस क्र. बी.टी. 3964) अहमदपूर-चाळीसगाव (क्र. एम.एच. 14-6522, उदगीर-गंगापूर (क्र. एम.एच. 14-8938) यासह अन्य दोन बस फोडण्यात आल्या. दुपारी अडीचपर्यंत हे आंदोलन सुरुच होते. या आंदोलनामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.









