
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील वादग्रस्त आणि बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले पुन्हा एकदा कायद्याच्या जाळ्यात सापडला आहे. गुजरात पोलिसांनी लातूरमधून मध्यरात्री धडक कारवाई करत कासलेला ताब्यात घेतले आहे. सुरत परिसरात झालेल्या जबरी घरफोडी आणि चोरीच्या प्रकरणात आरोपींना मदत केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
गुजरात पोलिसांना घरफोडी प्रकरणातील अटक आरोपींकडून रणजीत कासलेचे नाव समोर आल्यानंतर, मागील दोन दिवसांपासून विशेष पथक त्याच्या शोधात होते. अखेर एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने लातूर येथे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
सुरत व परिसरात जबरी घरफोड्या करणार्या टोळीतील काही आरोपींना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी रणजीत कासलेने आपल्याला मदत व संरक्षण दिले, अशी माहिती दिली. या माहितीनंतर गुजरात पोलिसांनी बीड व लातूर परिसरात शोधमोहीम राबवून अखेर कासलेला पकडले. लातूर पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर रणजीत कासलेचा ताबा गुजरात पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. त्याला आता पुढील तपासासाठी सुरतला नेण्यात आले आहे.
रणजीत कासले हा पूर्वी बीड जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता. मात्र, विविध वादग्रस्त कृत्यांमुळे त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्याच्यावर यापूर्वीच सात गुन्हे दाखल असून हा आठवा गुन्हा ठरणार आहे. बडतर्फीनंतर रणजीत कासलेने सोशल मीडियावरून अनेक राजकीय नेते आणि पोलिस अधिकार्यांवर थेट आरोप केले होते. त्यानंतर तो चर्चेत आला होता. मात्र आता पुन्हा एकदा त्याच्या अटकेमुळे बीड जिल्ह्यात आणि पोलिस वर्तुळात खळबळ माजली आहे.








