
मुख्य आरोपी फरारच, चार पथके शोधासाठी
पोलीस उपनिरीक्षक बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर
संपदाच्या पार्थीवदेहावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार

वडवणी/फलटण (रिपोर्टर): वडवणी तालुक्यातल्या कोठरबन येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने उभ्या महाराष्ट्रात शासन आणि प्रशासन व्यवस्थेविरोधात प्रचंड संतापाची लाट निर्माण केली आहे. रात्री अकरा वाजता संपदाच्या पार्थीवदेहावर तिच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी संतप्त नातेवाईकांनी व्यवस्थेतील सर्वच दोषींना फाशी द्या, म्हणत संताप व्यक्त केला. दुसरीकडे संपदा मुंडे याचंयावर अत्याचार करणारा नराधम पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा अद्याप फरार असून त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर येथे सापडले. याच प्रकरणात जो दुसरा संशयित आरोपी आहे प्रशांत बनकर याला पुण्यातील त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवरून आज पहाटे अटक करण्यात आली. गोपाळ बदने या नराधमाच्या शोधासाठी चार पथके तैनात करण्यात आले आहेत.
या संतापजनक घटनेची अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील कोठरबन येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेली डॉ. संपदा मुंडे ही तरुणी मोठ्या मेहनतीने एमबीबीएस डॉक्टर झाली. ती फलटण येथे रुग्णालयामध्ये गेल्या दोन वर्षांपासून सेवा देत होती. याठिकाणी ती बनकर यांच्या घरी पेईंगेस्ट म्हणून राहायची मात्र परवा रात्री उशिरा तिने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने हातावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने चार वेळश अत्याचार केल्याचे तर घर मालकाचा मुलगा प्रशांत बनकर याने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे स्पष्टपणे लिहिले. या घटनेने उभ्या महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. शासन आणि प्रशासनातील लोक किती निगरगट्ट आहेत हे तिच्या पत्रव्यवहारातून आता स्पष्ट होत आहे. या प्रकरणात भाजपाच्या एका माजी खासदाराचे आणि त्याच्या पीएचे नाव समोर येत आहे. रात्री उशिरा कवडगाव येथे संपदा मुंडे हिच्या पार्थीव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नातेवाईकांनी दोषींना अटक करण्याची मागणी केली. दुसरीकडे या प्रकरणाने उभ्या महाराष्ट्रात संताप उफळून आल्याने पोलीस अॅक्टीव मोडवर पहायला मिळाले. यातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक बदने याचे शेवटचे लोकेशन हे पंढरपूर येथे मिळाले. त्याने तेथेच आपला मोबाईल बंद केला. तर पुण्यातील एका फार्म हाऊसवरून प्रशांत बनकर या आरोपीला ताब्यात घेण्यात आले.








