
चार वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
पहिल्या टप्प्यात नगर परिषद, नगरपंचायत तर दुसर्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक
मुंबई (रिपोर्टर): दुबार मतदाराचा मुद्दा आक्रमकपणे मांडत विरोधक स्थानीक स्वराज्य संस्था निवडणूक मतदार याद्या सुरळीत करून घ्या, अशी एकीकडे मागणी करत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबीत असरार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आज अखेर निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. आज दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यक्रम घोषीत करतील, अशी विश्वसनीय माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या आणि दुसर्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असेही सांगितले जाते.
महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून म्हणण्यापेक्षा पाच ते सात वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. न्यायालयाने तीन महिन्यात निवडणूक घेण्याबाबतचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावयाची असताना विरोधकांकडून दुबार मतदार हा मुद्दा आक्रमकपणे मांडत निवडणूक आयोग या गंभीर मुद्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीकडून गेल्या दोन दिवसांपूर्वी ‘सत्याचा मोर्चा’ काढला गेला. मात्र निवडणूक आयोग विरोधकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचे आता स्पष्टपणे जाणवत असून निवडणूक आयोगाने नियोजीत केलेल्या मतदार याद्यानुसारच ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पत्रकार परिषदेतून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यक्रम ते घोषीत करतील, असे सुत्रांचे सांगणे आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायती, दुसर्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या, तर तिसर्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.
निवडणुकांना आव्हान देणार्या याचिकांवर सुनावणीस सुरू
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान देणार्या 42 याचिकांवर आज एकत्रित सुनावणी सुरू झाली आहे. दुसरीकडे निवडणूक आयोग दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. पत्रकार परिषदेबरोबर उभ्या महाराष्ट्राचे लक्ष न्यायालयाच्या सुनावणीकडे लागून आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दाखल असलेल्या 28 याचिका मुंबईकडे वर्ग केल्याचे सांगण्यात येते.







