
आष्टीत धोंडे-आजबेंना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव -राजेंद्र मस्के
बीड (रिपोर्टर): स्थानीक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्याबाबत शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाची पुर्णत: तयारी झाली असल्याचे सांगत या निवडणुकीत लोकांना नगरसेवक नव्हे तर जनसेवक द्यायचा आहे, असं म्हणत नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मोठ्या प्रमाणावर इच्छूक आमच्याकडे उमेदवारी मागत आहेत. यामध्ये विरोधी पक्षाचे इच्चूकही उमेदवारी मागत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला.
त्यांनी आज पत्रकार परिषद घेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे स्थानीक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्याबाबत पूर्ण तयारी झाल्याचे म्हटले. गेल्या तीस वर्षांच्या कालखंडात बीडमध्ये क्षीरसागरांची सत्ता असताना त्यांनी शहरात काय विकास केला? हा सवाल विचारत बीडची स्थिती अत्यंत खराब असल्याचे त्यांनी म्हटले. या निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही तालुकास्तरावर बैठका घेतल्या आहेत. दहा तालुक्यात आमच्या बैठका पूर्ण होऊन निवडणुकीला कसे सामोरे जायचे ? यावर चर्चा झाली आहे. बीड नगरपालिकेसाठीच नव्हे तर अन्य नगरपालिकांसाठीही आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर इच्छूक उमेदवार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी तेवढ्याच प्रमाणात उमेदवार असून विरोधी पक्षाचे इच्छूकही आमच्याकडे उमेदवारी मागत असल्याचा दावा या वेळी राजेंद्र मस्के यांनी केला. पुढे ते म्हणाले, आष्टी-पाटोदा या भागात माजी आमदार धोंडे, आजबे यांच्या सोबत निवडणूक लढविण्याबाबतची कार्यकर्त्यांची मनिषा आहे. तश्या आशयाचा प्रस्ताव आम्ही पक्षाकडे पाठविला आहे.






