
हेक्टरी पन्नास हजार मदत द्या, सातबारा तात्काळ कोरा करा
शेतकर्यांनो एकत्रित या, मंत्र्यांना प्रश्न विचारा, दगाबाज सरकार उलथून टाका
बीडच्या पालीत उद्धव ठाकरेंनी साधला शेतकर्यांशी संवाद
बीड (रिपोर्टर): तेव्हा फडणवीस मोठमोठ्याने म्हणायचे, ‘सातबारा कोरा करो, कोरा करो’ अरे चोरा, असे म्हणत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल चढवला. ते आता पंचांग पाहून मुहूर्त काढत आहे. मुहूर्तावर मुहूर्त निघून गेले, सरकारला मुहूर्त सापडत नाही. अजित पवार बेधडकपणे ‘आम्हाला निवडणूक जिंकायची होती, म्हणून कर्जमाफीची घोषणा केली’, असे सांगतायत. शेतकर्यांना हातपाय हलवा, असे म्हणतायत. ठाकरे म्हणाले, तुम्ही काय हलवताय? मराठवाड्यातील अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झालाय. त्याला तात्काळ मदतीची गरज आहे. मात्र सरकार कोपराला गुळ लावतय. लाडल्या बहिणीच्या नावाखाली घराघरामध्ये भांडणं लावतय. सहा महिन्यांनी कर्जमाफी करणार तर मग तोपर्यंत हप्ते भरायची की नाही? असा सवाल उपस्थित करत मी दोन लाक शेतकर्यांची कर्जमाफी केली होती. आताची परिस्थिती पाहता शेतकर्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत देण्यात यावी, कर्जमाफीची तुमची जूनची मुदत मान्य नाही. असं म्हणत आता मंत्र्यांना थेट जाब विचारा. एकीचे बळ दाखवत दगाबाज सरकारला उखडून फेका, असे आवाहन ठाकरेंनी केले.
ते बीडनजीक असलेल्या पाली येथील शेतकर्यांशी संवाद साधत होते. या वेळी उध्दव ठाकरे यांच्या सोबत अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, बीड जिल्हा शिवसेनाप्रमुख गणेश वरेकर, उल्हास गिराम, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी या ठिकाणी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलेला आहे, भाषण करण्यासाठी आलेलो नाही, आपल्यासोबत संवाद सांधत आहे. इथे शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री बिहारमध्ये प्रचार करत आहेत आणि तिथे छातीठोकपणे फडणवीस सांगतात, सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं बिहारवरती आहे. हा आवडकी-नावडकीचा खेळ कुठपर्यंत खेळणार? अतिवृष्टीने मेटाकुटीला आलेल्या शेतकर्यांना सरकारने जाहीर केलेली मदत पोहचलेली नाही. पीक विम्यापोटी दोन-तीन रुपये देऊन थट्टा केली. सरकार आता जूनपर्यंत कर्जमाफी करण्याबाबतचा वायदा दिला. तो वायदा आम्हाला मान्य नाही. शेतकर्यांना तात्काळ कर्जमुक्त करा आणि हेक्टर पन्नास हजार रुपये द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली. ही मदत मिळाली नाही तर शिवसेना आक्रमकपणे आंदोलन करेल.
मी इथे आज मत मागायला आलेलो नाही, तुमच्या लढ्यासाठी, मराठवाड्याच्या पाहण्यासाठी दौर्यावर आलो आहे. तुमच्यामुळे मातीत बी पेरून अंकुर फुटतात तर तुमच्या एकीने या सरकारला पाझर फुटणार नाही का? तुम्ही आता शेतकरी म्हणून एक व्हा, असे आवाहनही या वेळी उद्धव ठाकरेंनी केले. लाडक्या बहिणींचा मुद्दा उचलताना ठाकरे म्हणाले, आता फक्त घरामध्ये दोन लाडक्या बहिणी असणार आहेत. तिकडे आरएसएसचे प्रमुख म्हणतात, जास्त आपत्य जन्माला घाला आणि इतकडे घराघरात फडणवीस भांडणे लावत आहेत. हेच फडणवीस सातबारा कोरा करो, कोरा करो, अरे चोरा म्हणत ठाकरेंनी फडणविसांवर हल्लाबोल केला. मी यापूर्वी ‘देता की जाता’ म्हणून बीडला आलो होतो. त्यावेळी केंद्रात कृषीमंत्री शरद पवार होते. मी दोन लाख शेतकर्यांना कर्जमाफी केली. परंतु हे सरकार केवळ थापा मारतय. हे सरकार दगाबाज आहे. दगाबाज सरकारला दगाबाजीनेच संपवलं पाहिजे, त्यामुळे आधी कर्जमाफी करा, मग मतदान देतो, असं थेट सांगा. मंत्र्यांना जाहीर प्रश्न विचारा. असेही ठाकरेंनी या वेळी सांगितलं. कर्जमाफी तात्काळ केली नाही, 50 हजाराची हेक्टरी मदत दिली नाही तर शिवसेना आक्रमकपणे आंदोलन करेल, असा इशाराही ठाकरेंनी या वेळी दिला.





