
राष्ट्रवादीकडून बंडू लांडे तर भाजपकडून चव्हाण की पाटील?
मराठा क्रांती उमेदवार उभा करणार? पर्यायी अपक्षही राहणार ?
बीड (रिपोर्टर): जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत राहणार्या पिंपळनेर जिल्हा परिषद गटामधून कोण निवडणूक लढवणार? ही उत्सुकता एकीकडे जनतेत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अनेक जण निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे दिसून येते. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य सौ. डोईफोडे यांचे पती गणपत डोईफोडेंसाठी निवडणूक सोडा, तिकिट मिळणे मुश्किल होऊन बसले असून सांडरवण येथील बंडु लांडे हा राष्ट्रवादीचा नवा चेहरा या मतदारसंघातून उमेदवार म्हणून समोर येण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीमध्ये उमेदवाराची जशी रेलचेल तशी भारतीय जनता पार्टीकडून पिंपळनेरचे माजी सरपंच सतीश पाटील यांचे चिरंजीव मनोज पाटील आणि माजी जि.प. सदस्य मदनराव चव्हाण यांचे चिरंजीव सुंदर चव्हाण हे तिकिट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अन्य मराठा क्रांती मोर्चाकडूनही या ठिकाणी उमेदवार येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाचा उमेदवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात असल्याने पिंपळनेर जिल्हा परिषद गट जिल्ह्यातच नव्हेतर राज्यभरात चर्चेत आला होता. त्यावेळी जयदत्त क्षीरसागरांचे निकटवर्तीय गणपत डोईफोडे हे अल्पशा मतांनी विजयी झाले होते. भारतीय जनता पार्टी ही तिसर्या क्रमांकावर फेकली गेली होती तर क्रांती मोर्चाचा उमेदवार हा विजयी फाटीपर्यंत पोहचला होता. गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात निवडून आलेल्या गणपत डोईफोडेंनी मतदारसंघात संपर्क ठेवला नाही आणि गुत्तेदारीवर लक्ष ठेवले. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत डोईफोडे यांना उमेदवारी मिळेल का? यावर प्रश्नचिन्ह असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडे जाऊन डोईफोडे यांनी उमेदवारी मागितली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे समर्थक असलेले डोईफोडे यांना पर्याय म्हणून सांडरवण येथील बंडु लांडे यांचे नाव आता चांगलेच चर्चेत आले आहे. लांडे यांचा संपर्क राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांसोबत असून राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून बंडु लांडे हा चेहरा येऊ शकतो. तिकडे भारतीय जनता पार्टीकडून सतीश पाटील यांचे चिरंजीव मनोज पाटील हे तयारीला लागले आहेत. तर मदनराव चव्हाण यांचे चिरंजीव सुंदर चव्हाणही जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपाकडे दावा करत आहेत. गेल्या वेळेस भाजपाने पाटील यांना उमेदवारी दिली होती. आता भाजप चव्हाण की पाटील? या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देतं? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इथे मराठा क्रांतीबरोबर अन्य एक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहे.





