मुंबई (रिपोर्टर): उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानाजवळ ड्रोनच्या संशयास्पद घिरट्यांमुळे खळबळ उडाली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर नजर ठेवली जात असल्याचा शिवसेना नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे. मातोश्री जवळ ड्रोन घिरट्या घालत असल्याचे एका सुरक्षा रक्षकाने बघितले आणि याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. यानंतर हा प्रकार उघड झाला. मात्र हे ड्रोन एमएमआरडीकडून महत्त्वाच्या कामासाठी उडविले जात असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेरवाडी परिसरात असलेल्या ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाच्या खिडकीतून एका सुरक्षा रक्षकाने परिसरात घिरट्या घालणारा ड्रोन पाहिला त्यानंतर लगेच याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली. यानंतर हा प्रकार गंभीर असल्याचे आणि याची चौकशी करण्याची शिवसेना नेत्यांनी केली.
ठाकरे गटाचे प्रवक्ते हर्षल प्रधान एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, या ड्रोनच्या माध्यमांतून उद्धव ठाकरेंवर नजर ठेवली जात आहे की काय अशी शंका येत आहे. मातोश्री हे महत्त्वाचे ठिकाण आहे, त्यामुळे याची दखल केंद्रीय स्तरावर घेतली पाहिजे. ड्रोन कुणी फिरवला याची चौकशी झाली पाहिजे आणि मातोश्रीची सुरक्षा वाढवली पाहिजे.
तर सुषमा अंधारे यांनी म्हटले की, मातोश्रीवर पाळत ठेवण्याचा प्रकार होत असेल तर हे गंभीर आहे. असं कोण करतं आहे हे सरकारने शोधून काढावे. सरकारने अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची सुरक्षा वाढवली आहे अन् मातोश्रीची सुरक्षा जाणूनबूजून कमी केली आहे. याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल त्यांनी केला.










