बारामती (रिपोर्टर): एकही रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे देऊन तसा कागद देऊन व्यवहार होऊ शकतो हे आजपर्यंत मला कळले नाही. नोंदणी कार्यालयातील व्यक्तीने अशी नोंदणी का केली? चुकीचे काम का केले? हे चौकशीअंती आपल्याला कळेल. निवडणुका जवळ आल्या की, आमच्यावर आरोप सुरु होतात, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटले.
ते बारामती येथे पत्रकारांशी बोलत होते. पुढे अजितदादा म्हणाले की, 2009 साली असाच 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप माझ्यावर झाला. त्याला आता पंधरा वर्षे झाली तरी कोणी पुरावे देऊ शकले नाही. यातून आमची बदनामी होते, तरीही माध्यमातून अनेक प्रवक्ते आरोप करत असतात. शेवटी चुकीचे कोणी काही केले आणि त्यांच्यावर आरोप झाले तर आम्ही समजू शकतो. परंतु पुरावे नसतानाही सकाळपासून रात्रीपर्यंत आरोप करणे चुकीचे आहे. पार्थ पवार कुठे आहेत? ते बोलत का नाहीत? असे विचारल्यावर अजित पवारांनी ‘त्याच्या बापाने भूमिका मांडली ना, बारामतीमध्ये जमीन गैरव्यवहाराबाबत जे आरोप झाले त्यावरही या वेळी त्यांनी स्पष्टीकरण दिले. 1994 साली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 5 एकर जमीन खरेदी प्रस्ताव दिला होता, ग्रामपंचायतीने त्यासंदर्भात ठराव पारीत केला होता, त्यानंतर 2003 साली ही जमीन संघाच्या ताब्यात आली, तिथे बारामतीच्या विकासाच्या दृष्टीने काम करण्यात आले. निवडणुका आल्या की, आम्हाला लक्ष्य करण्यासाठी आम्हाला बदनाम करण्यासाठी असे प्रकरण बाहेर काढले जातात, असे अजितदादा म्हणाले.











