दिंद्रुड येथे आ. धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक
दिंद्रुड (रिपोर्टर): गेल्या दोन-तीन दिवसांपासून माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेवर दगडफेक व चुकीच्या पद्धतीने हार घालत,काळे फासण्याचे प्रकार होत आहे, मुंडे यांची प्रतिमा मलिन होण्याचा हा प्रकार असून या चुकीच्या बाबींमुळे धनंजय मुंडे समर्थकांनी रविवारी सकाळी धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत प्रतिमा मलीन करणार्यांचा निषेध व्यक्त केला.

यावेळी दिंद्रुड व परिसरातील धनंजय मुंडे यांचे समर्थक परळी चौक येथे जमा होऊन धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेचा अभिषेक करत धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.यावेळी बालासाहेब घोळवे, माऊली खाडे, आप्पासाहेब बडे, प्रसाद डापकर, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष राजेभाऊ कटारे, विलास बडे, प्रकाश कांदे,अजय खाडे, महादेव तिडके, ज्ञानोबा बडे सह धनंजय मुंडे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पाथर्डी, घोगसमारगाव, बीड येथे मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
बीड (रिपोर्टर): ‘माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणार्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय’, अशा घोषणा देत मुंडे समर्थकांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला ठिकठिकाणी दुग्धाभिषेक घातले. बीड, पाथर्डी, घोगसपारगाव या ठिकाणी मोठी घोषणाबाजी करत हे दुग्धाभिषेक घातले.










