बीड (रिपोर्टर): अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी नगरपालिकेसाठी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्यात युती होत जागा वाटपाचा फार्म्यूला ठरला गेल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत असून बारा ते पंधरा जागांवर भाजप आणि वीस ते तेवीस जागांवर अजितदादांची राष्ट्रवादी या ठिकाणी उमेदवारी देण्याची तयारी दाखवत आहे. या युतीबाबत अधिकृत शिक्कामोर्तब आणि घोषणा होण्याची दाट शक्यता आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातल्या अन्य पाच नगरपालिकांसाठी वेगवेगळ्या पक्षांचे नेते इच्छूकांची मनधरणी करण्यात गुंतल्याचे पहावयास मिळत आहे. तब्बल दहा वर्षानंतर निवडणुका होत असल्याने सगळ्याच पक्षात इच्छुकांची बहुगर्दी दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ही दहा वर्षानंतर होत असल्याने या निवडणुकीत आपल्यालाच उभे राहायचे यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता प्रचंड उत्सुक आहे. ज्या पक्षाचं काम करतो तो पक्षात उमेदवारी मिळण्याचे चिन्ह धूसर दिसले की, तो तात्काळ पक्ष बदलाच्या तयारीत पहायला मिळतो. ही वस्तूस्थिती बीड जिल्ह्यात दिसून येते. बीडमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी, भाजपा आणि एकनाथ शिंदेंची सेना अद्याप एकत्र पहावयास मिळाली नाही. त्यामुळे या तिन्ही पक्षात बंडखोरी होऊ नये, या पक्षातून त्या पक्षात कोणी जाऊ नये यासाठी कार्यकर्त्यांची मनधरणी चालू आहे. कारण इथं तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची बहुगर्दी पहायला मिळाली. गेवराई वगळता अन्य कुठल्याही पक्षाने अद्याप नगरपालिका अध्यक्षपदाचा उमेदवार घोषीत केलेला नाही. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष असतं. त्यात परळीकडे अधिकतेने लक्ष केंद्रित केलेलं असतं. त्या परळीमध्ये मुंडे भाऊ-बहीण उद्याच्या निवडणुकीमध्ये एकत्रित लढणार असल्याचे सांगितले जाते. तब्बल पंधरा वर्षानंतर धनंजय मुंडे अणि पंकजा मुंडे हे भाऊ-बहीण एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. 2016 साली जालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने 28 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ 5 जागांवर यश आलं होतं. आता दोघं एकत्रित निवडणुका लढणार असून 35 जागांच्या या नगरपालिकेसाठी 12 ते 15 जागा या भाजपासाठी आणि 20 ते 23 जागा या अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी असणार आहेत. त्यांच्या युतीवर आज शिक्कामोर्तब होईल.











