कटाक्ष/गणेश सावंत
बीड जिल्हा राजकीयदृष्ट्या तसा अत्यंत संवेदनशील. या जिल्ह्याचे नाव घेताच समोर येते, सत्तेसाठी चाललेली अदलाबदल, गटबाजी आणि राजकीय तापमानाने पेटलेले वातावरण. राज्यात कुठेही राजकीय भूकंप झाला की, त्याचा केंद्रबिंदू ठरतो तो बीडच. हा इतिहास आहे. राज्यातील सतर जिल्हे प्रतिक्रिया देण्यामध्ये व्यस्त असतात तेव्हा बीड जिल्ह्याचे राजकारण, पुढे काय करायचे? याचा अंदाज घेऊन दिशा ठरवायला लागतात. इतका वेग, इतकी महत्वाकांक्षा आणि तितकीच सत्तालालसा बीडच्या मातीत पुढार्यांप्रती सातत्याने दिसून येते. मग तो छोटा नेता असो की, कित्येकदा मंत्रीपद भूषविलेला मुरब्बी राजकारणी असो, तो सत्तेच्या उबेशिवाय राहूच शकत नाही. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतायत आणि त्याच निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्याचे राजकीय चित्र पुर्णत: ढवळून निघाले आहे. पक्षनिष्ठा, विचारधारा, तत्वनिष्ठा याचे अर्थच येथे जणू हरवलेले. सत्ता कुठे तिथे आम्ही, हा नवा धर्मच बीडच्या पुढार्यांनी स्विकारलेला दिसतो. तो त्यांचा दोष नाही. यथा राजा तथा प्रजा असतेच. राज्याचं नेतृत्व करणारे पक्ष इकडून तिकडे जात असतील, पाच वर्षात तीन-तीन शपथविधी होत असतील तर त्या नेत्यांच्या नेतृत्वात काम करणार्या दुसर्या आणि तिसर्या फळीतील राजकारण्यांकडून अपेक्षा ती काय करायची?
You are reading a sarcastic article in Beed Reporter by Ganesh Sawant, Executive Editor.

राजकारण्यांचा नवा धर्म
कोणता? हा प्रश्न उपस्थित केला तर नक्कीच सत्तेच्या लालसेत या पक्षातून त्या पक्षात उडी मारणे हाच आजच्या राजकारण्यांचा धर्म म्हणावा लागेल. सर्वसामान्य जनतेला जरी ‘गर्व से कहो….’ म्हणत धर्म बंधनात हे लोक अडकवत असले तरी स्वत: मात्र गर्व से कहो, या धर्मबंधनात न अडकता ‘कुकर्म से सत्ता-धर्म तक जावो’ या बिरुदावलीला अंगीकारतात. मुळात बीडच्या राजकारण्यांविषयी संताप व्यक्त करण्याचं कारणच नाही. कारण जिथं एकनिष्ठता, पक्षविचार, इमान आणि इज्जत जर मोठमोठ्या पक्षांनीच सत्तेच्या खुंटीला बांधलेली असेल तर स्थानिक नेतृत्वाच्या ‘भाद्रपद’ महिन्यावर भाष्य करण्यात अर्थ तो काय? आज राजकीय नेत्यांच्या इकडून तिकडच्या पक्षप्रवेशावरचा
हा कटाक्ष
You are reading a sarcastic article in Beed Reporter by Ganesh Sawant, who is the Executive Editor.

जिल्ह्यात नेमकं काय चालू? हे वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठीच. राजकारणातलं थोरलं घर म्हणून ज्या क्षीरसागरांच्या घराकडे पाहिलं जातं ते घर गेल्या दशकभराच्या कालखंडात अक्षरश: राजकीयदृष्ट्या विखुरलं गेलय. थोरल्या घरचे थोरले म्हणून जे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आहेत त्यांनी अनेक सत्ताकारण उपभोगले. मात्र गेल्या दशकभरापासून त्यांचा राजकीय वनवास आजच्या नवख्या राजकारण्यांना बरचं काही सांगून जाणारा. नव्हे नव्हे तर अभ्यासाचा विषय असणारा म्हणावा लागेल. पुतण्याने बंड केल्यानंतर क्षीरसागरांच्या घरात जो राजकीय संघर्ष सुरु झाला तो दशकभराच्या कालखंडात कुरुक्षेत्रापेक्षाही मोठा जिल्ह्यासाठी तरी मानला जातोय. या घरातल्या राजकीय महत्वकांक्षी असलेल्या काका-पुतण्यांनी वेगवेगळे पक्ष निवडले. प्रामुख्याने दशकभरापूर्वी बंडखोरी करून बाहेर पडलेले संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत. दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर हे अजितदादांच्या राष्ट्रवादीत तर तिसरे पुतणे तथा संदीप क्षीरसागरांचे धाकटे बंधू आता कमळ हातात घेताना दिसतात. जयदत्त क्षीरसागर मात्र आजपावेत वेटिंगवर पहायला मिळत आहेत. एकूणच एका घरात जेव्हा चार विचारधारा निर्माण होतात तेव्हा प्रश्न असतो, तो

सत्तेच्या उबेचा
ती उब नुसती क्षीरसागरांनाच हवीय, असे नाही. आष्टी-पाटोद्यात माजी आमदार असलेले भीमराव धोंडे हे भाजपाचे खंदे समर्थक. मात्र त्यांना काल भारतीय जनता पार्टीची विचारधारा सोडावी लागली आणि ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विकासाचा मार्ग शोधत नव्या शक्तीनिशी जोडलो गेल्याचे म्हणू लागले. त्यांचं असं म्हणणं असलं तरी हा निर्णय केवळ विकासाचा की, सत्तेच्या समीकरणाचा? हा प्रश्न जनतेच्या मनात ठळक आहेच. तिकडे कुंडलिक खांडे हे गेली वर्षभर आपल्याला सत्तेच्या छायेत उभे राहता येते का?याची चाचपणी करत राहिले खरे परंतु कुठेही सत्तेची सावली मिळत नसल्याचे पाहून सरशेवटी संघर्ष करण्याची उमेद ठेवत अखेर काल त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवबंधन हाती बांधत पुन्हा एकदा संघर्षाची मशाल पेटवली. ही माल लोकांच्या प्रश्नासाठी पेटवली गेली का? लोकांच्या हितासाठी पेटवली गेली का? की स्वत:ला राजकारणात जिवंत ठेवण्यासाठी, स्वत:चं राजकारण प्रकाशमय करण्यासाठी पेटवली गेली? हे लोकांना चांगलं माहितीय. तिकडे आ. क्षीरसागर यांचे निकटवर्तीय म्हणून ज्या सतीश शेळकेंकडे पाहिलं जातं ते आमदारांचे पीए म्हणून राहिले, त्यांनी काल आपल्या एका छोट्याश्या टीमसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. सतीश शेळकेंचा हा प्रवेश नेमका कशासाठी? याप्रश्नापेक्षा बीड जिल्ह्यात ही



राजकीय उलथापालथ का?
हा प्रश्न इथं कुणाला पडण्यापेक्षा तो विचारला गेला तर पहिलीतलं पोरगंही त्याचं उत्तर देईल. ही सगळी राजकीय उलथापालथ केवळ आणि केवळ सत्तेच्या उबेसाठी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये उमेदवारीचं तिकिट मिळविण्यासाठी आहे. प्रश्न एवढाच, बीडचे पुढारी जितके महत्वाकांक्षी, सत्ताकारणाच्या गणितासाठी संघर्ष करणारे, तसे त्यांनी लोकांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला, विचारधारेशी इमान राखला, जनसेवा हीच पक्षसेवा मानली तर आम्हाला वाटतं हा राजकीय भाद्रपदाचा महिना बीड जिल्ह्यात कधी येणार नाही
You are reading a sarcastic article in Beed Reporter by Ganesh Sawant, who is the Executive Editor.











