बीड : ऑनलाईन रिपोर्टर
अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक छळ केल्याप्रकरणी शिरूर तालुक्यातील एका आरोपीस तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ मा. एस.एस. घोरपडे यांनी २० वर्षे सश्रम कारावास आणि १०,००० रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. हा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल मानला जात असून या प्रकरणात सहा सरकारी वकील अॅड. अजय श्रीमंतराव तांदळे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली.
प्रकरणाची हकिगत
दिनांक ३१.०८.२०२३ आणि ०१.०९.२०२३ रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ केला होता. ही घटना पिडीतेच्या घरी घडलेल्या भांडणानंतर उघडकीस आली.
दिनांक ०२.०९.२०२३ रोजी संध्याकाळी पिडीतेचा भाऊ तिच्यावर “काल काय केले ते सांगतो” असे म्हणाल्यामुळे घरच्यांच्या लक्षात संशय आला. चौकशी केल्यानंतर पिडीतेने अश्रूंमध्ये संपूर्ण घटना सांगितली.
पिडीतेच्या म्हणण्यानुसार, शाळा सुटल्यावर घरी जात असताना एका आरोपीने तिला घरात ओढून नेले आणि तिच्यावर लैंगिक छळ केला. त्याच वेळी तिचा भाऊ दारातून आवाज दिल्याने आरोपी घाबरून तिला सोडून पळून गेला.
पोलिस कारवाई व तपास
पिडीतेच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन शिरूर कासार येथे आरोपीविरुद्ध खालील कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला—
- भादंवी कलम ३७६(अ), ३७६(ब), ३७६(ड)
- POCSO कायदा २०१२ कलम ५(ग), ६, ११(१), १२
या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक डी. बी. कोळेकर, पिंक पथक आष्टी यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
न्यायालयीन कार्यवाही
सुनावणी तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ मा. एस.एस. घोरपडे यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले.
पिडीतेची साक्ष, प्रत्यक्षदर्शी पुरावे, वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकाऱ्यांचे पुरावे आणि सरकारी वकील अॅड. अजय तांदळे यांच्या प्रभावी युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
उर्वरित दोन आरोपी हे विधीसंघर्षग्रस्त बालक असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध वेगळे दोषारोपपत्र बाल न्याय मंडळ, बीड येथे दाखल करण्यात आले आहे.
सरकारी पक्षाचे योगदान
- सहा सरकारी वकील : अॅड. अजय श्रीमंतराव तांदळे
- सहकार्य : अॅड. पी.बी. जगताप
- मार्गदर्शन : जिल्हा सरकारी वकील श्री. अजय दि. राख
- तपास अधिकारी : पोनि. डी.बी. कोळेकर
- पैरवी अधिकारी : पोलीस कॉन्स्टेबल सुरेश कदम
या निकालामुळे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले जात असून परिसरात न्यायालयाच्या या कठोर शिक्षेचे स्वागत केले जात आहे.










