बीड प्रतिनिधी |
गेवराई पंचायत समिती कार्यालयातील अभियंता विनायक राठोड याला लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. एका शेतकऱ्याच्या गायगोठा फाईल करण्यासाठी त्याने 1,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराकडून एसीबीकडे दाखल करण्यात आली होती.
विनायक राठोड यांनी 19 नोव्हेंबर रोजी बीड शहरातील अंबिका चौकातील प्रायव्हेट कार्यालयात ही लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. मात्र राठोडला संशय आल्याने तो तक्रारदाराला टाळू लागला. तरीदेखील लाचेची मागणी सिद्ध झाल्याने एसीबीने पुढील कारवाई केली.
शनिवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी सोपान चित्तमपल्ले यांच्या पथकाने राठोडला ताब्यात घेतले. शासकीय पगार असूनही अवघ्या हजार रुपयांच्या लाचेसाठी हात काळे केल्याचा आरोप राठोडवर आहे.
एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.










