बीड (रिपोर्टर): बीड नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या भाजपा उमेदवार डॉ. ज्योती घुंबरे यांनी आज भगवानगड, नारायणगड येथे नतमस्तक होत नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेत निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे पती डॉ. रविंद्र घुंबरे हे उपस्थित होते. बीडच्या सर्वांगीण विकासाबाबत कटिबद्धतेची शपथ घेत निवडणुकीला सामोरे जात असल्याचे म्हटले. राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्याने बीडमध्ये सेवा करण्याची संधी द्या. बीडच्या पाणी, रस्ते, व्यापार, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासह अन्य विकासात्मक धोरणे आखून बीडला सुजलाम् सुफलाम् करण्याचे ध्येय डॉ. ज्योती घुंबरे यांनी मांडले.
आज सकाळी भाजपा उमेदवार डॉ. ज्योती घुंबरे व डॉ. रविंद्र घुंबरे हे दाम्पत्य कार्यकर्त्यांसमवेत भगवानगडावर डेरेदाखल झाले. त्याठिकाणी भगवानबाबांच्या समाधीशी नतमस्तक होत हे दाम्पत्य नारायणगडावर आले. त्याठिकाणी नगदनारायणाचा आशीर्वाद घेऊन नवगण राजुरीच्या श्रीच्या चरणी लीन होत घुंबरे दाम्पत्याने निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’, असे म्हणत बीडच्या विकासाबाबत कटिबद्ध असल्याचे डॉ. ज्योती घुंबरे यांनी म्हटले. डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात बीड नगरपालिकेची निवडणूक आपण लढवत आहोत ती केवळ आणि केवळ बीडच्या सर्वांगीन विकासासाठी. शहरातल्या पाणीटंचाईपासून व्यापार, शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षा, स्वच्छता या सुविधा वाढवण्यासाठी. शहरात रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून एमआयडीसी सह अन्य धोरणांसाठी आपण सच्च्या दिलाने काम करणार, असा विश्वास व्यक्त करत डॉ. घुंबरेंनी बीड शहराला विकासाच्या नवीन मार्गावर नेण्याचे भाजपाचे व्हिजन ठिकठिकाणी नागरिकांसमोर ठेवले.










