नागपुर, (रिपोर्टर)ः- राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतांना महायुती सरकार शेतकर्यांसाठी फक्त घोषणा करते, प्रत्यक्षात मात्र सरकारची सर्व धोरणे शेतकर्यांच्या विरोधात आहेत. कर्जमाफी नाही, कापसाला हमीभाव मिळत नाही हे फडणवीस नव्हे फसवणीस आहेत असा आरोप करत विरोधकांनी कापसाच्या झाडासह विधान भवनाच्या पायर्यावर आंदोलन केले तर विधीमंडळामध्ये महिला सुरक्षेच्या मुद्दयावरून सत्ताधारी विरोधकात प्रचंड खडाजंगी झाली. दुसरीकडे फलटन उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर मुख्यमंत्र्यांनी निवेदन करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजलगावचे आ.प्रकाश सोळंके यांनी मृत महिलेच्या कुटूंबियातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पिडितांच्या कुटूंबियांना योग्य ती मदत दिली जाईल असे आश्वासन दिले.
राज्याचे हिवाळी अधिवेशन कालपासून नागपुरात सुरू झाले आहे. विविध विषयांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असून आज सकाळी विधिमंडळाच्या पायर्यावर विरोधकांनी आक्रमक होत हे फडणवीस नव्हे फसवणूक सरकार असल्याचे सांगत आंदोलन केले. एकीकडे सरकार आश्वासनं देतं दुसरीकडे मात्र शेतकर्यांकडे दुर्लक्ष करतं. इथे राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. कर्जमाफीसाठी आंदोलन होत असतांना सरकार शब्द पाळत नाही. कापसावरील आयात करत शुन्य करण्यात आला, त्यामुळे परदेशातील कापूस भारतात येवू लागला. सोयाबीन खरेंद्री केंद्र अद्याप सुरू झालेले नाहीत तसेच धानाला देखिल बोनस मिळत नाही. यासह शेतकर्यांच्या अन्य मागण्या घेवून विरोधकांनी आंदोलन केले. दुसरीकडे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले. मयत डॉ.संपदा मुंडे यांच्या प्रकरणात आरोपीतांना कठोर शिक्षा केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगत फॉरेन्सिक अहवालानुसार फलटणच्या डॉक्टर महिलेने जे तिच्या हातावर लिहिलं आहे ते तिचं हस्ताक्षर आहे. महिला डॉक्टरचं शारिरीक शोषण करण्यात आलं आहे. लग्नाचं आमीष दाखवणं वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तिचं शोषण केल्याचं स्पष्ट झालं आहे. बदनेप्रमाणेच दुसर्या आरोपीनेही महिलेची फसवणूक केली आहे. त्यामुळेच या महिलेने आत्महत्या केली. गळफास लावून हा मृत्यू झाला आहे आणि हातावरचं अक्षर महिलेचं आहे असं स्पष्ट झालं आहे. अनेक गोष्टी या प्रकरणात समोर आल्या. त्याचीही चौकशी करण्यासाठी आपण न्यायाधीशांकडून चौकशी करतो आहोत अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.नोकरी किंवा व्यवसाय करतात अशा महिलांच्या दृष्टीने अधिक सजग होण्याची आपल्याला आवश्यकता आहे. फलटणच्या डॉक्टरचे व्हॉट्स अॅप चॅट वगैरे सगळं ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलं आहे. तिथे कोण आलं कोण गेलं याचा लेखाजोखाही घेण्यात आला आहे. अशा गुन्ह्यांमध्ये साठ दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करतो. चार्जशीट दाखल करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी माजलगावचे आ.प्रकाश सोळंके यांनी संपदा मुंडे यांच्या कुटूंबियातील व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कुटूंबियांना यथोचित मदत केली जाईल असे म्हंटले.












