राशीन (ता. कर्जत) । प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील रहिवासी आणि अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार सुदाम राजकुमार पोकळे (वय 29) यांचा गुरुवारी रात्री रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असतानाच एका भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने पोलीस दलासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
सुदाम पोकळे हे कर्जत पोलीस ठाण्यांतर्गत राशीन पोलीस चौकी येथे कार्यरत होते. गुरुवारी रात्री ते आपल्या सहकार्यांसोबत नेहमीप्रमाणे गस्तीवर (पेट्रोलिंग) होते. यावेळी राशीन परिसरात एका अज्ञात भरधाव वाहनाने अचानक त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की गंभीर जखमी अवस्थेत सुदाम पोकळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असून संबंधित वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कर्तव्यनिष्ठ, शांत स्वभावाचे आणि सहकार्यांत लोकप्रिय असलेले सुदाम पोकळे हे आपल्या कामाबाबत अत्यंत दक्ष म्हणून ओळखले जात होते. कायदा व सुव्यवस्था राखताना त्यांनी सदैव जबाबदारीने काम केले. कर्तव्य बजावत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे.
सुदाम पोकळे यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या मूळ गावी चिंचाळा (ता. आष्टी) येथे शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि लहान मुलगा असा मोठा परिवार आहे. कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगाने संपूर्ण गाव हळहळले आहे. कर्तव्यावर असताना प्राण गमावलेल्या सुदाम पोकळे यांना पोलीस दलाकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून त्यांच्या कार्याचा आदराने उल्लेख केला जात आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलाने एक कर्तव्यनिष्ठ जवान गमावला आहे.











