बीड (रिपोर्टर): संतोष देशमुख खून प्रकरणात आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज 19 डिसेंबर रोजी आरोपींवर चार्ज फ्रेम होण्याची दाट शक्यता आहे. सुनावणीला सुरुवात झाली असून सातत्याने कोर्टाचा वेळ घेणार्या आरोपींनी एक नवीनच योजना आखली आहे. या प्रकरणात उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून नको, असा अर्ज आरोपींनी कोर्टात सादर केला आहे.
आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले यांच्याकडून कोर्टात सादर करण्यात आलेला आहे. सरकारी वकील हे राजकीय पक्षाशी निगडित असल्याने सुनावणीवर परिणाम होत असल्याचा उल्लेख अर्जामध्ये करण्यात आलाय.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने या प्रक्रियेवर परिणाम होतोय, असं आरोपींचं म्हणणं आहे. विशेष मकोका न्यायालयात सुनावणी सुरु असताना हा अर्ज देण्यात आलेला आहे.
यावर उज्वल निकम यांनी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले, कायद्यामध्ये अशी कुठेही तरतूद नाही, आपण वकील आहोत आणि ही केस लढू शकतो. आरोपींकडून जो अर्ज करण्यात आला आहे तो रिजेक्ट करण्यात यावा, असे अॅड. निकम यांनी म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला आहे.
दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर आहेत. आरोपींचे वकील विकास खाडे, अनंत तिडके, राहुल मुंडे हे न्यायालयात हजर आहेत. सरकारी पक्षाकडून विशेष सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हे न्यायालयात हजर असून आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायालयात हजर आहेत.












