आंबेजोगाई (प्रतिनिधी) : शक्तीपीठ मार्गामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शक्तीपीठ मार्ग बाधित शेतकरी कृती समितीच्या वतीने आज आंबेजोगाई येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलनाची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घोषणाबाजी व निदर्शने करून करण्यात आली. त्यानंतर शेतकर्यांनी मोर्चाच्या स्वरूपात उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व ड. अजय बुरांडे आणि कॉम्रेड मोहन गुंड यांनी केले. शक्तीपीठ मार्गाच्या कामामुळे अनेक शेतकर्यांच्या जमिनी बाधित होत असून त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे. बाधित शेतकर्यांना योग्य व न्याय्य मोबदला देण्यात यावा, तसेच त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चादरम्यान शेतकर्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले. यामध्ये बाधित शेतकर्यांना योग्य नुकसानभरपाई, पुनर्वसन व न्याय मिळावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात परिसरातील मोठ्या संख्येने बाधित शेतकरी सहभागी झाले होते. कृती समितीच्या वतीने शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








