मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून हा केवळ राजकीय नव्हे, तर वैयक्तिकदृष्ट्याही मोठा धक्का असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलताना अत्यंत भावूक झाले होते.
मुख्यमंत्री म्हणाले, महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’ नाटकातील सुभाषिताचा उल्लेख करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो, पण मित्रशोक हा हृदय आणि आत्म्यालाही जाळतो. अजितदादांसारखा सच्चा मित्र आणि सहप्रवासी गमावणे ही केवळ राजकीय हानी नाही, तर आपल्या सर्वांच्या अंत:करणाला वेदना देणारी गोष्ट आहे. काही जखमांवर काळ औषध असतो, पण अजितदादांच्या जाण्याने झालेली वेदना कधीही कमी होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
सभागृहातील त्यांच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री म्हणाले, अधिवेशनादरम्यान नजर वळली की अजितदादा आपल्या जागेवर बसलेले दिसायचे. सकाळपासून रात्रीपर्यंत ते कामात मग्न असायचे. यावर्षी त्यांनी बारावा अर्थसंकल्प मांडला असता, तसेच पुढील वर्षी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाची बरोबरी केली असती. मात्र त्यांच्या अचानक जाण्यामुळे अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी आता माझ्यावर आली आहे.
अजित पवार हे कठोर निर्णय घेणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व होते, असे सांगताना त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसारख्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांच्या ठाम भूमिकेचा उल्लेख केला. योजना सुरू झाल्यानंतर अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालायला सुरुवात केली होती आणि आम्हालाही प्रेरणा दिली. त्या सर्व गोष्टी आता आठवणींमध्ये राहिल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
राजकारणात अनेकदा एखाद्या नेत्याच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाल्याचे म्हटले जाते. मात्र अजितदादांसारखा सक्षम, अनुभवी आणि स्वतःचे स्वतंत्र नेतृत्व निर्माण करणारा नेता आपल्यातून निघून गेल्यावर पोकळी म्हणजे काय असते, हे आज खर्या अर्थाने जाणवत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवंगत नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.








