मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा देण्याच्या सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चाकणकर या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर गेल्या. तेथे झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपल्या पदाचा अधिकृत राजीनामा सादर केला.
राजीनामा पत्रात चाकणकर यांनी नमूद केले की, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. वैयक्तिक कारणास्तव आपण स्वेच्छेने पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच आतापर्यंत सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री व सहकाऱ्यांचे आभारही त्यांनी व्यक्त केले आहेत.
दरम्यान, राजीनामा देण्यापूर्वी चाकणकर यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली होती. पोलिसांना दिलेल्या निवेदनात त्यांनी अशोक खरात यांच्या कथित गैरकृत्यांचा उल्लेख करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
या घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











