नेकनूर| ऑनलाईन रिपोर्टर
बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार दत्तात्रेय बळवंत यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि. 6) दुपारी ही कारवाई नेकनूर पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणातील काम करून देण्यासाठी संबंधित अंमलदाराने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कारवाई करत अंमलदार दत्तात्रेय बळवंत यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे नेकनूर पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
‘कॅरेक्टर खराब करून टाकीन’ प्रकरणामुळेही होते चर्चेत
अटक करण्यात आलेले अंमलदार दत्तात्रेय बळवंत यांचे नाव यापूर्वीही एका वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आले होते. काही महिन्यांपूर्वी शेतीच्या वादातून एका व्यक्तीस “तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन” अशी धमकी देत असल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या घटनेनंतर त्यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
आता लाचखोरीच्या प्रकरणात झालेल्या कारवाईमुळे “बळवंतच्याच कॅरेक्टरवर एसीबीची टाच” अशी चर्चा परिसरात रंगली असून पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.







