धक्कादायक! खंडणीसाठी कॉन्ट्रॅक्टरच्या मुलीचे अपहरण
तीन लाखांची मागणी, आष्टी पोलिसांकडून वेगाने तपास इंदापूर-भिगवन परिसरातून मुलीची सुटका खंडणीखोराच्या मुसक्या बांधल्या
आष्टी (रिपोर्टर) गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवरील पोलिसांचा वचक कमी होत चाललाय का? असा सवाल विचारण्याची वेळ गंभीर गुन्ह्यावरून सर्वसामान्यांवर येत असून आष्टी शहरातील एका मोठ्या गुत्तेदाराकडून खंडणी वसूल करण्याइरादे खंडणी बहाद्दरांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. आष्टी पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि गोपनिय पद्धतीने या अपहरण प्रकरणाचा तपास करून इंदापूर-भिगवन परिसरातून पिडित मुलीची सुटका केली तर खंडणीबहाद्दराच्या मुसक्या बांधल्या. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून आष्टी पोलिसांच्या तत्पर कर्तव्याचे कौतुक होत आहे.
आष्टी शहरातील एका गुत्तेदाराकडून खंडणी मिळावी म्हणून 25 मार्चच्या रात्री अज्ञात इसमाने त्यांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. सदरच्या घटनेचे गांभीर्य ओळखून गुत्तेदाराने या प्रकरणाची माहिती आष्टी पोलिसांना दिली. त्यावरून अज्ञात इसमाविरुद्ध गु.र.नं. 115/2023 कलम 363 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करूएन पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे यांच्याकडे या गंभीर प्रकरणाचा तपास देण्यात आला. या तपासासाठी पोलिसांनी एक पथक नियुक्त केले. याच दरम्यान खंडणी बहाद्दराकडून (पान 7 वर)
संबंधित गुत्तेदार यांना वारंवार तीन लाख रुपये मागणीचे फोन येत होते. दुसरीकडे आष्टी पोलीस आणि सायबर विभाग या फोनवर लक्ष ठेवून होता. तांत्रिक तपासाला आष्टी पोलिसांनी वेग देत संबंधित आरोपी आणि पिडित मुलगी ही इंदापूर-भिगवन परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर आष्टी पोलिसांनी या भागात सापळा रचला. तेव्हा खंडणी बहाद्दरांनी पिडित मुलीस डांबून ठेवल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तेव्हा पोलिसांनी अत्यंत गोपनियतेनेआणि सावधपणे डांबून ठेवलेल्या ठिकाणावरून पिडित मुलीची सुटका करत तिला स्वत:च्या ताब्यात घेतले. याच दरम्यान संबंधित अपहरणकर्ता याच्याही पोलिसांनी मुसक्या बांधल्या. अवघ्या 24 ते 36 तासात आष्टी पोलिसांनी ही फत्ते कामगिरी बजावल्याने त्यांचे कौतुक होत आहे. ही कारवाई पो. अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पो. अधिक्षक सचीन पांडकर, विभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, पो.नि. हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. अजित चाटे, पो.ना. प्रवीण क्षीरसागर, विकास जाधव, महिला पोलीस स्वाती मुंडे, अंमलदार शिवप्रसाद तवले, सचीन कोळेकर यांनी केली.