गणेश सावंत
मो. नं. 9422742810
बोल बजरंग बली की जय म्हणत मतदान करा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला कर्नाटकात जनतेची आणि श्री हनुमान भक्तांची जी साद मिळाली ती साद न्यायाची, परमार्थाची, सत्याची आणि धार्मिक ध्रुवीकरणाला उद्ध्वस्त करणारी ठरली. म्हणून आज आम्ही बजरंग बलीचा धावा करत आहोत. आमच्या धाव्यात स्वार्थ नव्हे तर भक्ती आहे. आमच्या धाव्यात सत्ताकारणाची बेरीज नव्हे तर भक्तीच्या वाटेचा शोध आहे. म्हणूनच आम्ही जगद्गुरू तुकोबांचा हा प्रस्तुत अभंग याठिकाणी घेत आहोत.
शरण शरण जी हनुमंता ।
तुज आलों रामदूता ॥1॥
काय भक्तीच्या त्या वाटा ।
मज दावाव्या सुभटा ॥ध्रु.॥
शूर आणि धीर ।
स्वामिकाजीं तूं सादर ॥2॥
तुका म्हणे रुद्रा ।
अंजनीचिया कुमरा ॥3॥
अर्थ
हनुमंता, तुम्ही प्रभु राम चंद्रांचे सेवक आहात. म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. हे श्रेष्ट वीरा, भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत, त्या आम्हाला दाखवा. तुम्ही शुर वीर धैर्यवान आहात. पुरुषार्थ करने तुम्हीच जानता व स्वामीची तत्परतेने सेवा करता. तुकाराम महाराज म्हणतात, हे रुद्र, तुम्ही अंजनिमातेचे सुपुत्र आहात, आता हनुमंता, माझ्यासह तुमच्या नावावर सत्ताकारणाचे बेरजेकरण करणार्यांना खर्या भक्तीची वाट दाखवा. तसे तुम्ही तुमच्या वारा दिवशी म्हणजे शनिवार या हनुमान भक्तांच्या पवित्र वाराला तुम्ही प्रसन्न केले. जे खरे भक्त आहेत, ज्यांच्या भक्तीत सत्ता नव्हे तर सत्यता आहे, धर्माचे धु्रवीकरण नव्हे तर ‘खरा तो एकीची धर्म जगी जो प्रेम अर्पावे’ अशांच्या पाठीशी राहिलात अन् कर्नाटकात आपला खर्या रामभक्तीचा प्रहार वाच्चाळ वाचा करणार्या, वर्म नसणार्या शिंधळीच्या लोकांवर केला. म्हणूनच कर्नाटकाची निवडणूक ही धार्मिक ध्रुवीकरण करणार्यांसाठी अक्कलदायी ठरली. कर्नाटकात
भाजपाचा कसा
होता प्रचार
कर्नाटकातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तिथे नव्हते, सर्वसामान्य जनतेच्या मुलभूत गरजांवर भाष्य तिथे होत नव्हते, बेरोजगारांवर बोलायला भाजपाचा एकही नेता तयार नव्हता, आरोग्य, शिक्षणाचे भाजपाला देणेघेणे नव्हते. महिलांच्या सुरक्षेपासून त्यांच्या किचनमधल्या वाढत्या महागाईचेही भाजपाला काही देणेघेणे नव्हते, घेणे होते ते सत्ताकारणाचे, घेणे होते ते कुठल्याही स्थितीत सत्तेत येण्याचे, मग या सत्तेच्या मधाळ आणि मनमोहक उबेसाठी लोकांच्या मुलभूत प्रश्नांची गरज नव्हे, तर लोकांना भावनिक करण्याची गरज मानून भारतीय जनता पार्टीने कर्नाटकाच्या निवडणुकीत जो प्रचार केला तो जातीपातीचा होता, धार्मिक ध्रुवीकरणाचा होता. खोट्या हिंदुत्वाचा होता. एक पत्नी एक वचनी असलेले प्रभू राम आणि त्यांचे भक्त महाबली बजरंग बलीच्या नावाने मते हेटण्याचा होता. परंतु सत्ताकारणाचे गणित जुळवताना प्रभू रामचंद्राची सत्याची वागणूक भाजपाकडे नव्हती, न्यायीक बजरंग बलीची भक्ती भारतीय जनता पार्टीकडे नव्हती, तर तिथे दाखविण्यात आली होती, मुसलमानांची भीती, हिजाबची ख्याती, मुसलमान म्हणजे हिंदुंचा दुश्मन आणि काँग्रेस हा मुसलमानांचा पालनकर्ता. म्हणूनच अखंड भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर प्रचार सभेत ‘भाजपा पराभूत झाली तर दंगली होतील’, असे जाहीर विधान केले. बहुदा सत्य आणि सत्ता यामध्ये प्रभू रामासह बजरंगाने सत्याची बाजू धरली आणि भाकड धर्माचे उदो उदो करणार्या भाजपाला घरची जागा दाखविली. दुर्दैव याचं वाटतं, केवळ सत्तेसाठी सर्वसामान्य जनतेला सत्यापासून दूर ठेवणारे भाजप आणि त्यांची विचारसरणी अखंड हिंदुस्तानच्या एकतेला धोका म्हणावी लागेल. कर्नाटकाच्या निवडणुकीचे विवंचन करताना
मोदी-शहा म्हणजे
देश आणि धर्म नाही
हे या निकालातून कर्नाटकातल्या जनतेने दाखवून दिले. प्रचाराच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वीसहून अधिक सभा, मेळावे, मोदी…मोदीचे नारे, पुष्पवृष्टी, मिरवणुका, सोळा ते वीस केंद्रीय मंत्र्यांचा फौजफाटा, हजारोंवर, लाखोंवर कार्यकर्ते, मोठ्या जाहीर सभांपासून गल्ली कोपर्यातल्या छोट्या-मोठ्या सभांपर्यंत मोदी-शहांचे नारे होते. मोदी-शहा म्हणजे देश, मोदी-शहा म्हणजेच धर्म, मोदी-शहांच्या विचाराला जो विरोध करेल तो देशद्रोही, अन्य पक्षात जो काम करेल तो देशद्रोही या भूमिकेत नव्हे तर तोर्यात भाजप गेल्या आठ ते दहा वर्षांच्या कालखंडात एखाद्या नाकात वारं शिरल्यासारखे वळुसारखे उधळताना दिसून येते. भाजप असंवैधानिक पद्धतीने उधळत आहे हे सर्वश्रूत असताना या उधळणार्या वळुला वेसन टोचण्यापेक्षा निवडणूक आयोग त्याच्या दिमतीला राहते तेव्हा धार्मिक ध्रुवीकरणापासून उठलेला हिजाब, हलाल, मांस, समान नागरी कायदा, लव्ह-जेहाद आणि उरलीसुरली केरला स्टोरी, सावरकर यात्रा कर्नाटकात अक्षरश: उच्छाद् मांडते. परंतु निकालाअंती कर्नाटकाच्या सुजान जनतेने या एकही महत्वाच्या नसलेल्या विषयाला महत्व न देता गॅस सिलेंडरपासून खतांच्या भावापर्यंत लक्ष केंद्रित करत भाजपाचे सत्ताकेंद्राचे मनसुबा उद्ध्वस्त केले. तेथील जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडे. जागतिक पातळीवर अखंड भारत हा तेवढ्याच ताकतीने काल होता, आज आहे, उद्याही राहील. परंतु भारताअंतर्गत भाजपाच्या सत्ता केंद्रांमध्ये सुरू असलेल्या धार्मिक ध्रुवीकरणासह मनुवादी आणि उच्चवर्णीयांना दिले जाणारे महत्व अंतरभारतातल्या बहुजनांना, गोरगरीबांना, शेतकर्यांना, कष्टकर्यांना उद्ध्वस्त करणारे आहे परंतु कर्नाटक दक्षिण भारतातल्या या कन्नडीगांनी भाजपाच्या कानसुलात जी चपराक मारली ती वाट चुकलेल्या भाजपाला नक्कीच वाटेवर आणेल. भाजपाची
देशभक्ती
त्यांच्या मते ते म्हणतील तशी असेल तर त्या देशभक्तीला कोणी जुमानणार नाही. देशभक्ती असावी ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, देशभक्ती आणि धर्मभक्ती असावी ती छत्रपती संभाजी महाराजांसारखी, देशावर प्रेम असावे ते महात्मा गांधींपासून शाहू-फुले-आंबेडकरांसारखे बाबू गेणूपासून भगतसिंह, राजगुरू, सुखदेव या क्रांतीवीरांसारखी. भाजपाची देशभक्ती आहे ती थोतांडांची. धर्मकारण आणि धर्माबद्दल असलेले प्रेमही स्वार्थी. तुकोबांच्या भाषेत भाजपाच्या देशभक्तीचे विवेचन करायचे असेल तर जगी किर्ती व्हावी म्हणूनी झालासी गोसावी, बहु केले पाठांतर वर्म राहिलेसे दूर, चित्त नाही अनुताप, लटके भगवे स्वरुप, तुका म्हणे शिंदळीच्या वर्म श्रमविली वाचा, तुकोबा म्हणतात, भगवे वेष धारण करून अवघ्या जगात स्वत:ची किर्ती व्हावी म्हणून कोणी गोसावी होत असेल, अनेक ग्रंथ डोळ्याखालून घालून अथवा ग्रंथाचे पाठांतर करून सर्वश्रेष्ठ भक्त दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, त्याला जर खरा देव, खरा धर्म कशात आहे याचेच वर्म नसेल तर अशा व्यक्तीपासून दूर राहिलेले बरे आणि अशा व्यक्तींना जर पश्चाताप होत नसेल, भगवे वस्त्र घालून नुसता खोटा आव आणला जात असेल तर तुकोबा अशांना म्हणतात, ‘अरे शिंदळीच्या भाराभर ग्रंथाचे पाठांतर करून तू आपली वाणी उगाच कष्टविली आहेस’, होय कर्नाटकात तेच झालं,
मोदींची वाणी कष्टवली,
देशाच्या पंतप्रधानाने देशवासियांशी बोलताना काय बोलावे, लोकांच्या प्रश्नांना महत्व द्यावे की, एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन करावे हे आता वाचकांनीच सांगावे. पंतप्रधान मोदी कर्नाटकात जातात आणि तेथून ते जाहीर सभेत ‘केरला स्टोरी’ हा चित्रपट पाहण्यास सांगतात. अरे रे रे त्या चित्रपटाचे कथानक काय असेल, त्यापेक्षा त्या चित्रपटामध्ये जे संभोगाचे दोन ते तीन दृश्य दाखवले आहेत ते आम्ही आमच्या आई-बहीण आणि बायकोसोबत पहावेत हेच जर देशाच्या पंतप्रधानांचे आवाहन असेल तर आजच्या तरुण पिढीच्या पोटी कशी पैदास निर्माण होईल याचे तरी भान पंतप्रधानांना राहिला हवा होता. एखाद्या वेळेस नरेंद्र मोदींना त्या चित्रपटामध्ये काय आहे हे माहित नसेल, तो चित्रपट मुसलमानांच्या विरोधात आहे, तो चित्रपट पाहिल्यानंतर हिंदू एकवटतील, आपल्याच पक्षाला त्याचा फायदा होईल हे उद्दिष्ट ठेवून मोदी बोललेही असतील, परंतु खोटारडेपणाचा आव जास्त दिवस ठेवता येत नाही. खोट्या भक्तीला आणि नीतीलाही ईश्वर साथ देत नाही. म्हणूनच जिथे बजरंग बलीचे नाव घेतले तिथे बजरंग बलीने शनिवारीच भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात गदा घातली.