राज्यसभेच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या. ह्या निवडणुका देशातील विविध राज्यात झाल्या. महाराष्ट्र राज्यात सहा जागासाठी मतदान झाले. भाजपाने तीन उमेदवार दिले होते, हे तिन्ही उमेदवार निवडून आले, तिसरा उमेदवार निवडून आणण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं. शिवसेनेचा एक उमेदवार पडला. शिवसेना बेरजेचं राजकारण करण्यात कमी पडली. फडणवीस यांना आमदार फोडण्यात जितकं यश आलं तितकं शिवसेनेला आलं नाही. शिवसेना आपल्याच बाजुने मतदान होईल या भरोशावर राहिली. राजकारण कधीच शंभर टक्के भरोशाचं नसतं. कधी, कधी राजकारणात धोके होतात. त्यातून समीकरणं बदलू शकतात. त्यामुळे राजकारण करतांना कधी ही सावध आणि सक्षम असलं पाहिजे. राज्यसभेच्या तीन जागावर भाजपाचा विजय झाल्याने भाजपाचा आनंद गगणात मावेना, तीन पक्षाचं सरकार असतांना आपण त्यांना अस्मान दाखवलं असं भाजपावाल्यांना वाटू लागलं, तसं वाटणं सहाजीकच आहे. एकीकडे भाजपावाले आपल्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. दुसरीकडे भाजपाच्या दुसर्या गटात निराशा आहे. विधानपरिषदेवर आपली वर्णी लागेल असा अंदाज पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना होती. यावेळीही त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे भाजपाचा विजयाचा गुलाल बीडमध्ये उधळला नाही. उलट तीव्र प्रतिक्रया उमटू लागल्या, हे भाजपासाठी नक्कीच चांगलं नाही.
फडणवीस आणि पाटील
राज्यात काय करायचं हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दोघेच ठरवत असतात. त्यांच्या मर्जीशिवाय राज्यातील भाजपात पान ही हालत नाही. जेव्हा काही बालंट येतं. तेव्हा ते मात्र सोयीनूसार केंद्राकडे बोट दाखवत असतात. पंकजा मुंडे याचं राजकीय पुर्नवसन होणं गरजेचं होतं. मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. पंकजा ह्या नेत्या आहेत. राज्यातील भाजपाच्या नेत्यापेक्षा त्यांच्या सभेला जास्तच गर्दी होते हे मान्यच करावे लागेल. पक्ष चालतांना कोणाला झुकतं माप द्यायचं आणि कोणाला डावलायचं हे पक्ष चालवणार्यांच्या हातात असतं. पक्ष एखाद्याला नको असतांना देवू शकतो आणि एखाद्याला उन्हात ही उभा करू शकतो. पंकजा मुंडे आणि राज्यातील भाजपाच्या नेत्यात मतभेद आहेत. मतभेद आहे, म्हणुन एखाद्याचं राजकारण पुर्णंता उध्दवस्त करणं हे काही तत्वात बसणारं गणीत नाही. एकनाथ खडसे हे कदरुन राष्ट्रवादीत गेले. त्यांना पक्ष सोडण्यास मजबुर करण्यात आलं. एकनाथ खडसेंची अशीच प्रचंड मानहाणी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. त्यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने त्यांचं पुर्नवसन केलं. पंकजा मुंडे यांचं ही असचं पुर्नवसन होईल असं वाटत असतांना सर्व अपेक्षावर पाणी पडलं. पंकजा यांच्या उमेदवारी बाबत फडणवीस, पाटील केंद्राकडे बोट दाखवतात. त्याचं हे केंद्राकडे बोट दाखवणं कितपण खरं आहे? आम्ही पंकजासाठी खुप प्रयत्न केले, पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही ही भाषा चंद्रकांत पाटील यांची आहे. राज्यालाच काय केंद्राला पंकजा यांना मोठं होऊ द्यायचं नाही का?
समर्थकांना रोष
भाजपाला सर्व जाती, धर्माशी जोडण्याची काम यापुर्वीच्या नेत्यांने केलं. यामध्ये स्व. अटलबिहारी वाजपेयी,स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथराव मुंडे आणि अन्य काही नेत्याचा सहभाग आहे. आजच्या नवख्या भाजपा नेत्यांचं पक्ष वाढीसाठी तितकं योगदान नाही. जेव्हा राज्यात भाजपाचं काहीच नव्हतं. तेव्हा स्व. मुंडेंनी भाजपा घरा,घरात नेला. मुंडे यांच्या सारख्या बड्या नेत्यांना पक्षाने अनेक वेळा छळलेलं आहे. तोच कित्ता पंकजा मुंडे यांच्या बाबतीत गिरवला जावू लागला. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या निवडी वेळी खा. प्रितम मुंडे यांच्यावर अन्याय केला. त्याचं नाव ऐनवेळी कमी करण्यात आलं. राज्याच्या मंत्रीमंडळात असतांना पंकजा याचं जलसंधारण हे खातं कमी करुन ते राम शिंदे यांना देण्यात आलं होतं. विशेष करुन पंकजा मुंडे यांच्या मागे जो काही भ्रष्टाचाराचा भुंगा लागला होता. त्यात भाजपाचाच हात तर नव्हता ना? असं आता वाटू लागलं. पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी काही ठिकाणी रोष व्यक्त केला. कार्यकर्त्यांचा रोष हा सहाजीकच आहे, पण अतिटोकाचा रोष व्यक्त करणं हे तितकं राजकीय दृष्टया चांगलं नाही. संयम बाळगलेला चांगला. उतिउत्साही पणामुळे नुकसान होत असतं. याचा विचार कार्यकर्त्यांनी करायला हवा. विधान परिषदेसाठी भाजपाने ज्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यामुळे पक्ष खुपच वाढणार आहे का? प्रविण दरेकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. राम शिंदे यांना ही उमेदवारी दिली गेली. राम शिंदे यांचा पराभव झालेला नाही का? तरी त्यांना पक्षाने संधी दिली. तशीच संधी पंकजा यांना का दिली नाही? उलट पंकजा यांच्यापेक्षा इतर ओबीसींच्या नेत्यांना पुढे करण्याचं काम पक्ष करत आहे. इतरांना कितीही पुढे केले तरी पंकजा मुंडे यांच्या मागे जो ओबीसीचा मतांचा गठ्ठा आहे, तो इतरांकडे जाईल असं वाटत नाही. पक्ष कुरघोडीचं राजकारण खेळत आहे.
घटक पक्षाचं काय?
राज्यात घटक पक्षाची मोट बांधण्याचं काम स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी केलेलं आहे. रामदास आठवले, महादेव जाणकर, माजी. खा. राजू शेट्टी, आ. विनायक मेटे यांना एकत्रीत आणून बीडला मेळावा घेण्यात आला होता, घटक पक्षाचे नेते स्व. मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून भाजपा सोबत आले होते. कारण त्यांचा मुंडे यांच्यावर विश्वास होता. २०१४ च्या निवडणुकीनंतर स्व. मुंडे याचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर घटक पक्ष आणि मुंडे यांच्या सर्मथकांची तारांबळ उडू लागली. ज्यांच्या हाती भाजपाची धुरा आली. त्यांनी स्वत:च्या मर्जीनूसार पक्ष चालवण्यास सुरुवात करत मुंडे सर्मथकांना डावललं. मुंडे असते तर आज वेगळं वातावरण राहिलं असतं. फडणवीस आणि चंद्रकांत पाटील दिसले नसते. जे लोक इतर पक्षातून भाजपात आले. त्यांना भाजपाने सन्मान दिला. ज्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्या त्यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला. राजू शेट्टी यांना भाजपाची भुमिका आवडली नाही. म्हणुन त्यांनी भाजपापासून फारकत घेतली. रामदास आठवले यांना केंद्रात राज्यमंत्रीपद दिलं, ते त्यातच खुष आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपाने पदे दिले नाहीत. त्यांमुळे रिपाईचे कार्यकर्ते भाजपा सोबत खुप खुष आहेत असं काही नाही? विधान परिषदेवर कुणाची ना कुणाची वर्णी लागेल असं रिपाईच्या काही कार्यकर्त्याना वाटत होतं, पण तसं काही झालं नाही. कधी पर्यंत आपण असं लटकत राहणार अशी खंत निष्ठावंत रिपाईच्या कार्यकत्यांना सातवत आहे. मेटे यांना भाजपाच्या सत्ता काळात मंत्रीपदाची आशा होती. त्यांना मंत्रीपद मिळालं नाही. आता विधान परिषदेवर निवड केली जाईल असं वाटत होतं, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे मेटें याचं पुढील राजकीय भवितव्य काय? पुढे चालून त्यांना संधी मिळेल का? ते फडणवीस यांच्या मर्जीतील मानले जात होते. तरी त्यांना उमेदवारी दिली नाही. मेटे शांत आहेत, कारण त्यांना अशा आहे संधीची, संधी मिळाली नाही तर ते भाजपाचं पोस्टमार्टम केल्याशिवाय राहणार नाहीत. पदाविना काम करणं थोडं अवघड असतं. राजू शेट्टी यांच्या सोबत काम करणारे सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रीपद दिलं गेलं होतं, पण आता त्यांना भाजपाने वार्यावर सोडलं. त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल असं वाटत होतं. त्यांना डावण्यात आलं. खोत यांनी भाजपासाठी शेट्टी यांना सोडलं. शेवटी त्यांच्या पदरी काय पडलं? ज्यांनी, ज्यांनी भाजपाला जवळ केलं. त्यांना, त्यांना आज वार्यावर सोडण्यात आलं. घटक पक्षांच्या नेत्यांचा फक्त वापर करण्यात आला, हे घटक पक्षाच्या नेत्यांना कळू लागलं.
एकला चलो ची हाक
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेची तिसरी जागा खेचून आणली हे खरं आहे. एक जागा निवडून आणली म्हणजे जग जिंकलं असं होत नाही. फडणवीस यांच्या या कार्याचंं पवारांनी कौतूक केलं. पवार मोठे मनाचे आहेत, त्यामुळे त्यांनी फडणवीसाचं कौतूक केलं, जे आपल्या आघाडीला जमलं नाही, ते फडणवीसांनी केलं. याचं त्यांना आश्चर्य वाटलं असेल. शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार दिला हीच मोठी चुक ठरली असं म्हणावं लागेल. छत्रपती संभाजी महाराज यांना उमेदवारी दिली असती तर शिवसेनेवर ही नामुष्की आली नसती. राज्यसभा आणि विधान परिषद ह्या निवडणुका काही मतांच्या असतात. त्यात काही जनमत नसतं. ज्यांच्यापाठीमागे जास्त मत आहेत, किंवा जो मत खरेदी करु शकतो तो त्यात विजयी होतो. अशा निवडणुकीत घोडेबाजार जास्त प्रमाणात चालतो. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार चालला नसेल असं थोडंच आहे. काही छोटे पक्ष आणि अपक्षांना आपल्या सोबत घेण्यासाठी देवाण, घेवाण झालीच असणार? अपक्ष फुकट थोडेच मतदान करणार? इतर काही छोटे पक्ष आहेत, त्यांनी व्यवहार केलेच असतील? पक्षाची मते फुटली नाहीत. फुटाफुट झाली तर इतर छोटे पक्ष व अपक्षाची, ज्यांनी तगडी फिल्डींग लावली. त्याचं पारडं जड राहिलं. ज्यांनी सहज निवडणूक घेतली त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत शिवसेना तोंडावर पडली. अपक्षांनी आपल्यासोबत गद्दारी केली असं खा. राऊत सांगत आहे. ज्यांचा, त्यांचा प्रश्न असतो, मतदान कोणाला टाकाचयं? त्यात जबरदस्ती थोडीच करता येते. काही गोष्टी शिवसेनेने सयंमाने घेतल्या पाहिजेत. आजच्या घडीला फडणवीस आघाडीवर भारी पडले. त्यांनी येत्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा आणि जिंकण्याचा निर्धार केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपद पुन्हा आपल्याकडेच येणार असा ही विश्वास व्यक्त केला. त्यांचा हा विश्वास अतिमहत्वाकांक्षी असू शकतो. आपल्याच पक्षातील एक गट आपल्यावर नाराज आहे. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा व नंतरच एक हाती निवडून येण्याचं स्वप्न पहावं. भाजपात अतंगर्त नाराजांची संख्या जास्त आहे. ही नाराजी पक्षाला परवडणारी नाही. आज फडणवीसांच्या गोटात आनंद असला तरी त्यांच्या विरोधी गटात निराशा आहे याच भान ठेवायला हवं. पक्ष कधीच एकाने मोठा होत नसतो याचं आत्मचितंन भाजपाने केलं पाहिजे.