तलवाडा, जातेगाव, सिरसदेवी, उमापूर, मादळमोही, कोळगाव सह सर्कलच्या सर्वच गावांचा सहभाग
गेवराई (रिपोर्टर) अंबड तालुक्यातील अंतरवली साराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केलेल्या आमरण उपोषण या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज दि. 01 सप्टेंबर रोजी गेवराई शहर बंद ची हाक देण्यात आली होती. या बंद ला प्रतिसाद देत ग्रामीण भागातील सर्कलच्या सर्वच मोठमोठ्या गावांसह व व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
काल दि.31 रोजी 11 वा.शहरातील बेदरे लॉन्स येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वानुमते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फक्त गेवराई बंद ची हाक देण्यात आली होती. मात्र या आवाहनाला सर्व स्तरातून प्रतिसाद देत गेवराई शहरासह तालुक्यातील तलवाडा, जातेगाव, सिरसदेवी, उमापूर, मादळमोही, कोळगाव सह सर्वच सर्कलच्या मोठमोठ्या गावात कडकडीत बंद पाळण्यात आसून या बंद ला सर्वच संघटनेने पाठिंबा देऊन सहभाग नोंदवला. दरम्यान मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सकाळी शहरातून शांततेत भव्य रॅली काढली, यानंतर अंबड तालुक्यातील अंतरवली साराटी येथे ही रॅली घेऊन जात मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी जाऊन पाठिंबा देऊन आम्ही आपल्या सोबत असल्याचे सांगत त्यांना धीर दिला. यावेळी शहरासह तालुक्यातील हजारो मराठा बांधवांची उपस्थिती होती. तर या बंदला तालुकाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आरक्षण प्रश्नी सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन मार्ग काढावा नसता हे आंदोलन आणखी तीव्र करू असा ईशाराही गेवराई तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.







