प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्त कार्यालयाकडे पाठविला
बीड (रिपोर्टर): बीड जिल्हा परिषदेच्या वतीने 22 शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या नावाच्या मंजुरीसाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर 5 सप्टेंबर शिक्षकदिनी या शिक्षकांना सन्मानित करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
5 सप्टेंबर हा शिक्षकदिन अहे. अपवाद सोडला तर कधीही 5 सप्टेंबर या दिवशी बीड जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करून तो कार्यक्रम 5 सप्टेंबरला न घेता 17 सप्टेंबरला गेण्याची प्रथा बीड जिल्हा परिषदेने पाडलेली आहे, मात्र या वेळी विहित कालावधीमध्ये जिल्हा परिेदेने या पुरस्कारासाठी शिक्षकांचे प्रस्ताव मागवून त्यांची निवड केलेली आहे. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक व विशेष शिक्षक यांच्याकडून 80 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी प्राथमिकमधून 11 शिक्षक, माध्यमिक विभागातून 10 शिक्षक आणि विशेष प्रवर्गातून एका शिक्षकाची अशा एकूण 22 शिक्षकांची निवड या समितीने केलेली असून चारित्र्य पडताळणीच्या आधीन राहून विभागीय आयुक्तालयाच्या मंजुरीसाठी या 22 शिक्षकांचा प्रस्ताव शिक्षण विभागाने आज पाठवलेला आहे. दोन दिवस शनिवार, रविवार सलग सुट्ट्या आलेल्या आहेत. सोमवारपर्यंत जर विभागीय आयुक्त कार्यालयाने या शिक्षकांच्या निवडीला मंजुरी दिली तर मंगळवार 5 सप्टेंबर रोजी या शिक्षकांचा सन्मान होऊ शकतो. जर वेळेत विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिली नाही तर बीड जिल्हा परिषदेने पाडलेल्या प्रथेप्रमाणे 5 सप्टेंबर ऐवजी 17 सप्टेंबरला या शिक्षकांना सन्मानित करण्यात येईल.