आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटस्अॅपवर स्टेटस ठेवले
बीड (रिपोर्टर): आश्रम शाळेवर कार्यरत असणार्या एका पस्तीस वर्षीय शिक्षकाने चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अंतरवली पिंप्री शिवारामध्ये घडली. या शिक्षकाने व्हॉटस्अॅपवर स्टेटस दखील ठेवलेला आहे. पाच लाख रुपये देऊनही आपला संबंधितांकडून छळ होत असल्याचे या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आले आहे. सदरील चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शिक्षकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला.
अंकुश रामभाऊ पवार (रा. अंतरवणपिंप्री) हे आश्रम शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी त्यांनी अंतरवण पिंप्री शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली. या चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवले की, मी अंकुश रामभाऊ पवार, मी अमित अनवणे व कोमल अमित अनवणे व त्याच्या भावाने म्हणजे दत्ता गायकवाड, आकाश गायकवाड याची आई या सर्वांनी मिळून मला दहा लाख रुपयांची मागणी केली, त्यांना मी पाच लाख रुपये दिले, मात्र पुन्हा ते मला सतत ब्लॅकमेल करू लागले. मारण्याची धमकी देऊ लागले. कुटुंबालाही धमक्या दिल्या जात होत्या, असा उल्लेख चिठ्ठीमध्ये करण्यात आला. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटने बीड तालुक्यात एकच खळबळ उडाली.