गेवराई (रिपोर्टर)- चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरुच आहेत. या अवैध धंद्यांची ठाणेप्रमुखांपासून बिटअंमलदारापर्यंत सर्वांनाच माहिती असूनही कारवाई होत नाही. त्यामुळे या ठाणेदारांचे आणि अवैध धंदेवाल्यांचे काही लागेबांधे आहेत की काय, अशी चर्चा जनतेतून होत असतानाच बीडमधून गेलेल्या एपीआय नवलेंना तेथे अवैध वाळू वाहतूक करणारे चार हायवा मिळतात. मात्र स्थानिक पोलिसांना याची कुणकुणही लागत नसल्याने चकलांबा पोलीसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची ओरड जनतेतून होत असल्याने एपीआय नवले हे रात्री पेट्रोलिंगसाठी हद्दीत गेले होते. याच दरम्यान त्यांना गेवराई, चकलांबा रस्त्यावर चकलांबा हद्दीत चार हायवा वाळू घेऊन जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या हायवांचा पाठलाग करून त्यांना पकडले. या वेळी हायवा क्र. एम.एच. 21 बी.एच. 5922, दुसरा हायवा (क्र. एम.एच. 23 ए.यू. 2624), तिसरा हायवा (क्र. एम.एच. 17 डीवाय 5898), आणि चौथा (क्र. एम.एच. 21 बी.एच. 5939) हे चार हायवा पोलिसांनी अडवून चालकांकडे परवाना मागितला असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही. चारही हायवा पोलिसांनी ताब्यात घेऊन चकलांबा पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी चालक अंगद शामराव शिंगटे (रा. झापेवाडी ता. शिरूर), अशोक रावसाहेब डिेंगरे (रा. खामगाव ता. गेवराई), वैजिनाथ नारायण भांडवलकर (रा. अंकुशनगर महाकळा), दारासिंग गोरख चव्हाण (रा. तुपेवाडी तांडा ता. जि. संभाजीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय भास्कर नवले, मदन जगदाळे, महेश रुईकर, सुरवसे यांनी केली.
बीडच्या पथकाच्या चकलांबा हद्दीत अनेक
कारवाया; स्थानिक पोलीस वसुलीत दंग
चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्या गोदापत्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. या ठिकाणी बीडचे पथक येऊन मोठमोठ्या कारवाया करत असताना चकलांबा ठाण्याचे पोलीस मात्र वसुलीत दंग असल्याचे दिसून येत आहे. आज पहाटे एपीआय भास्कर नवले यांच्या पथकाने भल्या पहाटे गोदापत्रात जाऊन मोठी कारवाई केली. मात्र याबाबत रिपोर्टरने चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रमुख एकसिंगे यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांना 11 वाजेपर्यंत या कारवाईचा थांग पत्ता नव्हता की जाणून बुजून रिपोर्टर ला माहिती देण्याचे टाळले याबाबत संशय निर्माण होत आहे. मात्र याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून चकलांबा पोलिसांचे कान टोचण्याची गरज आहे.
चोरटी वाहतूक करणारा हायवा
महसूल विभागाने पकडला
आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान बीड शहरातील राजीव गांधी चौकात श्रीमती कविता जाधव यांनी कारवाई करत एक हायवा ताब्यात घेतला. हा हायवा पकडून तो जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आला आहे. या वेळी हायवा चालक पळून गेला असून त्याच्या मालकाचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई श्रीमती जाधवसह जिल्हा गौण खनिज अधिकारी माधव काळे, मंडल अधिकारी हंगे यांनी केली.