तीन घरे फोडली, सहा शेळ्या, तीन तोळे सोन्यासह रोख रक्कम पळविली
बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील उमरद जहागीर येथे रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत शेजारी असलेले दोन घरे फोडली. त्यानंतर तिसरे घरही फोडले. तोपर्यंत ग्रामस्थ जागे झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. मात्र यामध्ये एका शेतकर्याच्या सहा शेळ्या, एका घरातील तीन तोळे सोने आणि अन्य एका घरातील रोख रक्कम लंपास केल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी श्वानपथकासह फिंगर प्रिंट पथक आणि पोलीस दाखल झाले होते.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरद जहागीर येथे रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका घरातील तीन तोळे सोने चोरल्यानंतर शेजारीच असलेल्या एका घरात चोरीचा प्रयत्न केला. तेथे त्यांच्या हाताला 17 हजार रुपये लागले, मात्र घरचे लोक जागे झाल्याने चोरट्यांनी त्या घरातून पळ काढला. पुढे एका शेतकर्याच्या सहा शेळ्या त्यांनी चोरल्या. तोपर्यंत ग्रामस्थ जागे झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. चोरटे किती होते हे मात्र समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बीड ग्रामीण ठाण्याचे प्रमुख विश्वास पाटील यांच्यासह श्वानपथक, फिंगरप्रिंट पथक दाखल झाले होते. दुपारपर्यंत या प्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.