छत्रपती संभाजीनगर (रिपोर्टर): संभाजीराजेंना मी सांगणारा कोण? स्वराज्य संघटनेच्या पदाधिकार्यांना मात्र शांत राहण्याचे आवाहन करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही ओबीसी नेत्यांकडून वाद पेटवणे सुरू असल्याचा आरोप केला. ओबीसी नेते जाणूनबुजून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा ओबीसी नेत्यांचा डाव आहे. त्यामुळे मराठा समाजाने त्यांच्या बोलण्यात येऊ नये, मराठा समाजाने शांत राहावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी करून भुजबळ हे विदूषकासारखे राजकारणी कलाकार असल्याची जहरी टीका त्यांनी केली.
वातावरण दूषित होतय हे छगन भुजबळ यांच्यामुळेच. असा आरोप करून जरांगे यांनी छगन भुजबळ यांनी भीमा कोरेगाव बाबत बोलताना जातीवाचक शब्द काढले आहेत, यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. भुजबळ यांनी दलित समाजाने मोर्चा काढल्यामुळे महाराष्ट्राचे हुतात्मा स्मारक गोमुत्राने धूतले होते, हा त्यांचा इतिहास आहे. त्यावेळी त्यांना दलित समाज आठवला का? असा सवाल उपस्थित करत आज मात्र दलित समाजाची आवश्यकता असल्याचे ते बोलत आहेत. मराठा आणि दलित बांधव कधीच समोरासमोर येणार नाहीत, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. सरकार भुजबळांच्या दडपणाखाली आले असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे यांनी केला. 24 तारखेपर्यंत थांबा, भुजबळ यांचे सर्व बाहेर काढणार, असा इशाराही त्यांनी दिला. माझ्या वक्तव्या चुकीचा अर्थ काहींकडून काढला जातो, मी जातीवाद करत नाही, माझ्या वक्तव्याला जातीवादी अर्थ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांचे विचार मान्य असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला. केस पांढरे झालेल्या व्यक्तीला कायदा एवढा कळतो तर त्यांनी मराठा समाजाचे ओबीसी दाखले मिळत असल्याचे कागदोपत्री आणावे, असे आवाहन करून छगन भुजबळ यांचा विदूषकपणा सुरू असल्याची टीका त्यांनी या वेळी केली. मराठा समाजाला ओबीसी समाजात येता येते याचेही पुरावे सापडले आहेत. आतापर्यंत ज्यांनी मोठं केलं, त्यांना छाटीत छाटीत पुढे आले, असा आरोप करून मराठा समाजाचे कागदपत्र पाहताना छगन भुजबळ यांना वाचता येत नाही का? तेथे त्यांचे डोळेपण गेले आहेत का? अशी जहरी टीका करत राजकीय मंडली चांगलेच कलाकार असतात असेही त्यांनी म्हटले.











