मुंबई (रिपोर्टर): रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातल्या काही भागातील शेतकर्यांच्या तोंडचा घास पुन्हा हिरावला गेला असून मराठवाड्यात काढणीला आलेला कापूस भिजून अक्षरश: वाया गेला आहे. यासह कांदा, मका, हरभरा याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेआहे तर तिकडे नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षे बागांचे आतोनात नुकसान झाले आहे. परभणीत पुर्णा नदीला मोठा पूर आला आहे. राज्य सरकारकडून तात्काल पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रविवारी रात्री मराठवाड्यासह राज्यातल्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. पुणे, अहमदनगर, नंदूरबार,वाशी, नाशिक, नांदेड, बीड यासह अन्य काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपिटीसह पाऊस झाला. पुण्यामध्ये झालेल्या पावसाने कांदा, बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात छाटणी केलेले द्राक्ष फ्लॉवरींगमध्ये असून मनी धरण्याच्या स्थितीत आहेत. याच दरम्यान गारपीटीचा तडाका बसल्याने द्रांक्षवेलीचे पाने व काड्या तुटून पडल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. पुढील चार दिवस पुन्हा अवकाळी पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी ज्वारी झोपली तर कापसाच्या वाती झाल्या आहेत.











