परभणी:(रिपोर्टर)- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची इच्छा असेल तर गंगाखेड मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडण्यास मी तयार आहे असे जाहीर वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे. पंकजाताई मुंडे जर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असतील तर मी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडण्यास तयार असल्याचे डॉ. गुट्टे म्हणाले.
गंगाखेड तालुक्यातील माखणी येथे रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले की भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे सांगत आहेत की पंकजा मुंडे यांना मी निवडणुकीत पाडेन. अशा पद्धतीचा अपप्रचार भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून माझ्याविषयी चालू आहे पण मी पंकजाताई मुंडे यांचा आदर करत आहे त्यांनी जर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली तर मी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडेन.
त्याचबरोबर आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले की ज्यावेळेस पंकजा मुंडे या विधानसभा निवडणुकीमध्ये पडल्या त्यावेळेस त्यांच्यासाठी आमदारकीचा जेलमधून राजीनामा देण्यासाठी तयार असणारा मी पहिला आमदार होतो. त्यावेळेस मी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे देखील जाहीर केले होते. त्यामुळे माझ्याविषयी खोटा अपप्रचार करू नये. जो इमानदार असतो तो इमानदार असतो. साखर कारखान्याने ३३० कोटीचे कर्ज घेतले होते. त्या कर्जासाठी मी जेल देखील भोगली आणि ते कर्ज मी फेडले असेही आमदार गुट्टे म्हणाले.