केज (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, मराठ्यांनो तुम्ही जागरुक रहा, एकत्रित रहा, हिंसक आंदोलन करू नका, आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलू नका, लवकरच आपल्याला आरक्षण मिळणार असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी बोरी सावरगावच्या जाहीर सभेत सरकारला आरक्षण द्यावच लागेल, असा इशारा देत एकीचे बळ कायम ठेवण्याचे आवाहन मराठ्यांना केले.
काल अंबाजोगाई तालुक्यातील सभे दरम्यान जरांगे पाटील यांची तब्येत खालावली. त्यांना तात्काळ अंबाजोगाईच्या रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. रात्रभर सलाईन आणि उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील आज नियोजीत केज तालुक्यातील बोरीसावरगाव येथील सभास्थळी दाखल झाले. लाखोंच्या उपस्थितीत जमलेल्या जनसमुदायाला मार्गदर्शन करताना जरांगे यांचा आवाज थरथरत होता. आवाज थकवा जाणवत होता, मात्र तशा स्थितीतही उपस्थित मराठ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हे आपलं ध्येय असल्याचे सांगून सरकारने कितीही कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला तरी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाहीत, असे म्हणत मराठ्यांनो आपल्या लेकरांसाठी जागरुक रहा, एकत्रित रहा, हिंसक आंदोलन करू नका, आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलू नका, लवकरच आपल्याला आरक्षण मिळणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले. पुढे जरांगे पाटलांच्या आणखी दोन ते तीन सभा आज केज तालुक्यात आहेत.