बीड (रिपोर्टर): अंबा सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करणार्या कर्मचार्यांचा पगार थकित राहिल्यामुळे या कर्मचार्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली. कालपासून थंडीच्या कडाक्यात हे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत. या कर्मचार्यांच्या आंदोलनाची कसलीही दखल दुपारपर्यंत शासननाने घेतली नव्हती. जोपर्यंत काही निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पावित्रा कर्मचार्यांनी घेतलेला आहे.
अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखान्यामध्ये जवळपास 300 कर्मचारी काम करतात. या कर्मचार्यांचा पाच महिन्यांचा पगार थकलेला आहे. पगारासाठी कर्मचार्यांनी अनेक वेळा कारखान्याच्या अधिकार्यांकडे तगादा लावला मात्र पैसे देण्यासंबंधी कारखाना प्रशासन टोलवाटोलवी करत राहिले. पगाराअभावी कर्मचार्यांवर उपासामरीची वेळ आलीय, कारखान्याने पैसे द्यावेत या मागणीसाठी कालपासून कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत. थंडीच्या कडाक्यात देखील हे कर्मचारी आंदोलन करत असून या कर्मचार्यांच्या आंदोलनाची अद्यापपर्यंत प्रशासनाने दखल घेतलेली नव्हती.











