बीड (रिपोर्टर): रोजगार हमी योजनेअंतर्गत मस्टर काढण्याच्या पद्धतीत बराच बदल करण्यात आला. आतापर्यंत पंचायत समितीमधून मस्टर काढले जात होते, आता इथून पुढे ग्रामपंचायतीमधून मस्टर काढले जाणार आहेत. ग्रामपंचायत ऑपरेटरांना प्रशिक्षण दिल्यानंतर मस्टर काढले जाणार. गावपातळीवर वादावादीला जास्त जोर असतो, अशा परिस्थितीत गावातून मस्टर काढण्याचे आदेश दिल्यामुळे मस्टर वेळेवर निघणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय.
रोजगार हमी योजनेअंतर्गत गावात अनेक कामे सुरू असतात, यामध्ये वैयक्तिक सिंचन विहिरी, शेततलाव, फळबाग यासह आदींचा समावेश आहे. सध्या रोहयोचे अनेक कामे सुरू असून मजुराच्या नावे पैसे पडतात. आतापर्यंत पंचायत समितीमार्फत मस्टर निघत होते, मात्र रोहयोने त्यात बदल केला. प्रत्येक गावातून मस्टर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आधी गावातील ऑपरेटरांना प्रशिक्षण द्यायला हवे होते, नंतर मस्टर काढण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. तसे न करता थेट निर्णय घेऊन मस्टर काढणे बंद केले आहे. ऑपरेटरांना प्रशिक्षण कधी देण्यात येणार आणि गावातील वादावादीच्या राजकारणामुळे सर्व लाभार्थ्यांचे वेळेवर मस्टर निघणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.











