Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडना. मुंडेंच्या उपस्थितीत ऑनलाईन डीपीडीसी बैठक सुरू निधी खर्चावरून अधिकार्‍यांवर ना. मुंडे...

ना. मुंडेंच्या उपस्थितीत ऑनलाईन डीपीडीसी बैठक सुरू निधी खर्चावरून अधिकार्‍यांवर ना. मुंडे नाराज


बीड (रिपोर्टर) आर्थिक वर्ष संपायला अवघे दोन ते तीन महिने उरलेले असताना जिल्ह्यातील विविध खात्यांतर्गत मंजूर निधीचा जो खर्च विकासासाठी व्हायला हवा, तो खर्च झाला नसल्याचे अनेक खात्यात या बैठकीत दिसून आल्यानंतर पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी हे काही बरे नाही, असं म्हणत त्या त्या खात्याच्या अधिकार्‍यांवर नाराजी व्यक्त केली. काही खात्यात 17 टक्के तर काही खात्यात केवळ 20 टक्के निधी खर्च झाला. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत बैठक सुरुच होती.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेतली. याच प्रणालीद्वारे जिल्ह्यातील आमदार आणि खातेप्रमुख या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन मंडळ आणि राज्य शासनाने विविध योजनेद्वारे प्रत्येक
विभागाला दिलेला निधी याबाबतची माहिती सुरुवातीलाच घेतली. कोणत्याही विभागाने आतापर्यंत त्यांना उपलब्ध करून दिलेला निधी योजनेच्या प्रमाणात खर्च केलेला नाही. 31 मार्च 2022 ला आर्थिक वर्ष संपतो. आर्थिक वर्ष संपायला दोन ते अडीच महिन्यांचा कालवाधी शिल्लक आहे. नऊ महिन्यांमध्ये दिलेला निधी खर्च होत नाही तर दोन ते अडीच महिन्यात कसा खर्च करणार? या सबबीवर अनेक विभागांनी आपल्याकडील निधी का खर्च झाला नाही? याबाबतचे तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. कुठल्याही परिस्थितीमध्ये 31 मार्च 2022 च्या आत दिलेला निधी खर्च झालाच पाहिजे. तांत्रिक मुद्दे माझ्याकडे उपस्थित करू नका, काही मुद्दे असतील याबाबत जिल्हाधिकार्‍यांसोबत परत एकदा बैठक घेऊन हे मुद्दे निकाली काढा, काही बरोबर नाही, असे म्हणत अनेक विभागांवर पालकमंत्र्यांनी निधी खर्चाअभावी आपली नाराजी व्यक्त केली.

अधिकार्‍यांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्नशील
उपजिल्हाधिकारी दर्जाच्या परिविक्षाधीन अधिकार्‍यांना महसुली पदस्थापना देण्याचा शासन निर्णय निर्गमित झाला असून, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार या आदेशाद्वारे बीड जिल्ह्यास 5 उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी मिळाले आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदोन्नती (पान 7 वर)
वरून पदस्थापना अंतर्गत बीड जिल्ह्यात 2 कार्यकारी अभियंता दर्जाचे अधिकारी मिळाले असून त्यांना जिल्ह्यातील रिक्त पदांवर पदस्थापना देण्यात येणार आहे. एकीकडे जिल्ह्यात अधिकारी मिळत नाहीत वगैरे अशा चर्चा काही मंडळी जाणीवपूर्वक करत असताना बीड जिल्ह्यात अधिकार्‍यांची इनकमिंग मात्र सातत्याने सुरू आहे. प्राप्त आदेशानुसार श्री विश्वास शिरसाठ – भूसंपादन अधिकारी अंबाजोगाई या रिक्त पदावर, ओंकार देशमुख – जिल्हा पुरवठा अधिकारी बीड या रिक्त पदावर, दयानंद जगताप – उपजिल्हाधिकारी सामान्य बीड या रिक्त पदावर, श्रीमती प्रियांका पाटील – उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना बीड या रिक्त पदावर तसेच प्रमोद कुदळे – उपविभागीय अधिकारी पाटोदा या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर श्री प्रवीण मार्कंडेय यांची सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2 बीड येथे व श्री विलास गपाट यांना सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 1 बीड येथे पदोन्नती ने रिक्त पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील विविध महत्वाच्या पदांवरील प्रभारी राज याद्वारे संपुष्टात आले असून, या सर्व महत्वाच्या विभागांना आता पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत. बीड जिल्ह्यातील अधिकारी वर्गाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील आहोत, शासन आणि प्रशासन मिळून जनहीतार्थ काम करत राहू, असे यानिमित्ताने पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तांत्रिक अडचणी व इतर काही कारणांमुळे पूर्वीच्या ठिकाणी असलेले पदभार यामुळे अधिकारी लवकरच बीड जिल्ह्यात आपला पदभार येणार आहेत.

Most Popular

error: Content is protected !!