बीड (रिपोर्टर): शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे तत्कालीन जिल्हाप्रमुख तथा विद्यमान सहसंपर्क प्रमुख अनिल जगताप यांना जिल्हाप्रमुख पदावरून पायउतार केल्यानंतर ते काहीसे उबाठा सेनेच्या निर्णय प्रक्रियेवर नाराज असल्याची चर्चा होत असतानाच आज अनिल जगताप आपला राजकीय निर्णय घेणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येते. ते आज उबाठा सेनेतून बाहेर पडून थेट शिंदे गटात सामील होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बीडमध्ये उबाठा सेनेला जबरदस्त धक्का बसणार आहे.
गेले कित्येक वर्षे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद भुषावत शिवसेनेला गावागावात पोहचविणारे अनिल जगताप यांची ओळख म्हणजे शिवसेना, अशीच होती. मात्र वर्षभरापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. अनेकजण सत्तेसोबत जात शिंदे गटासोबत गेले. मात्र अनिल जगताप हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात राहून त्यांनी बीड जिल्ह्यात शिवसेनेला पडत असलेल्या भेगा बुझवण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या महिन्याभरापूर्वी शिवसेनेच्या नूतन जिल्हाप्रमुखांची घोषणा झाली. त्यामध्ये अनिल जगताप यांना शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून दूर करत त्यांच्यावर शिवसेना सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. तेव्हाच अनिल जगताप हे नाराज असल्याचे दिसून येत होते. नूतन जिल्हाप्रमुख वरेकर, सातपुते यांनी घेतलेल्या प्रेस दरम्यान ते उपस्थित नव्हते त्याचबरोबर त्यांच्या अन्य अॅक्टीव्हिटीमध्येही अनिल जगताप यांचा सहभाग दिसून येत नव्हता. त्यामुळे अनिल जगताप ठाकरेंची शिवसेना सोडणार, अशी चर्चा होत होती. अखेर आज त्या चर्चेला पुर्णविराम मिळणार असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. आज पत्रकार परिषद घेून अनिल जगताप हे उबाठा शिवसेना सोडून आपला राजकीय निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येते. जगताप यांनी ठाकरेंची शिवसेना सोहली तर ठाकरेंच्या सेनेला बीडमध्ये सर्वात मोठे भगदाड पडणार आहे. सुत्रांच्या सांगण्यानुसार जगताप हे शिंदे गटात सामील होण्याची दाट शक्यता आहे.