भाजपा आमदार सुनील कांबळेंविरुद्द रोष
मुंबई (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार ऊर्फ दादा यांच्या समोर पुण्यात भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी भाईगिरीचे वर्तन केले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या पाटीवर नाव नसल्याचे कारण पुढे करत थेट राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली तर आ. कांबळेंनी याच कार्यक्रमात पोलीस कर्मचारी शिवाजी सरग यांच्याही कानफटात मारल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे आता भाजपा आमदार कांबळे यांच्याबाबत पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही संतप्त असल्याचे सांगण्यात येते.
पुणे येथील ससून रुग्णालयात आज एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार याचंयासह स्थानीक आमदार सुनील कांबळे हेही उपस्थित होते. मात्र कांबळे यांना उद्घाटनाच्या पाटीवर आपले नाव नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावली. विशेष म्हणजे या वेळी अजित पवार हे तिथेच उपस्थित होते. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपाचे आमदार सुनील कांबळे हे एवढ्यावरच थांबले नाही तर उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर मंचावरून खाली उतरताना कांबळे यांनी त्याठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शिवाजी सरग यांच्याही कानशीलात लगावल्याची माहिती समोर येत आहे. आ. कांबळेंच्या या कृत्यानंतर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.