Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईममुंडे पिता-पुत्रांचा पुन्हा भ्रष्टाचार उघडकीस, रेणुका माता तेल-बिया संस्थेच्या अध्यक्षाने बोगस सह्या...

मुंडे पिता-पुत्रांचा पुन्हा भ्रष्टाचार उघडकीस, रेणुका माता तेल-बिया संस्थेच्या अध्यक्षाने बोगस सह्या करून शेतकर्‍यांना फसवले, शेतकर्‍यांची पंकज कुमावत यांच्याकडे धाव

केज (रिपोर्टर) केज तालुक्यातील देवीनिमगाव येथील विक्रम मुंडे हे कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत चर्चेत असतात. त्यांचा आणखी एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला. देवीनिमगाव येथील रेणुकामाता तेल बिया उत्पादक सहकारी संस्थेत भ्रष्टाचार करून शेतकर्‍यांना फसवण्यात आले. या प्रकरणी शेतकर्‍यांनी एएसपी पंकज कुमावत यांच्याकडे धाव घेऊन दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    देवीनिमगाव येथील विक्रम बाबुराव मुंडे यांनी 2003 साली देवगाव येथे रेणुकामाता तेल बिया उत्पादक सहकारी संस्थेची स्थापना करून दहा ते पंधरा गावच्या शेतकर्‍यांना कोणतीही माहिती न देता बनावट सह्या करून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखेकडून कर्ज घेतले होते. ज्या शेतकर्‍यांच्या नावावर कर्ज काढले त्यांना कोणतीही माहिती दिली नाही. कर्ज काढण्यासाठी दिलेले सर्व कागदपत्र बनावट असल्याचे ऑडीटमध्ये आढळून आले. दहिफळ वडमाऊली येथील ठोंबरे येळू कुंडलिक यांना दहिफळच्या तलाठ्याने नोटीस पाठविली. तुमच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 1 कोटी 25 लाख 69 हजाराची थकबाकी आहे. या नोटीशीने ठोंबरे यांना शॉकच बसला. आपण कर्ज तर घेतले नाही, नोटीस आली कशी?याबाबत सखोल माहिती घेतली असता हा प्रकार विक्रम मुंडे यांनी केला असल्याचे समोर आले. बोगस सह्या करून शेतकर्‍यांच्या नावावर पैसे उचलून शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी रेणुका माता तेलबिया संस्थेचे अध्यक्ष यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पिंटू ठोंबरे यांनी पंकज कुमावत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

पिता-पुत्राने शेतकर्‍यांना फाशी घ्यायची वेळ आणली
रेणुकामाता तेलबिया संस्थेने कर्ज परतफेड न करता रेकॉर्डली उद्योग तोट्यात दाखवून बँकेला लिलाव करण्यास भाग पाडले. बँकेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून कवडीमोल भावात संपूर्ण मालमत्ता, जंगम मालमत्तेसह कारखाना स्वत:चा मुलगा अतुल विक्रम मुंडे याच्या नावाने कवडीमोल भावात घेतला. याची चौकशी वरिष्ठ अधिकार्‍यांनी करून कारवाई करावी, अशी मागणीही पिंटू ठोंबरे यांनी केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!