वडवणी (रिपोर्टर): वडवणी ते तेलगाव मार्गे दोन गाड्यात गुटखा जात असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक धिरजकुमार यांना झाल्यानंतर त्यांच्या पथकाने सापळा रचून या दोन्ही गाड्या पकडल्या. या दोन्ही गाड्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. या गुटख्याची किंमत 17 लाख 72 हजार इतकी आहे. एका गाडीच्या चालकास पोलिसांनी अटक केली तर दुसर्या गाडीचा चालक फरार झाला आहे.
वडवणी ते तेलगाव मार्गाने दोन गाड्यात गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक धिरजकुमा यांना झाल्यानंतर त्यांच्या पथकातील कर्मचार्यांनी तेलगाव रोडवरील गजानन जिनिंगसमोर सापळा रचला. यामध्ये स्विफ्ट डिझायर गाडी (क्र. एम.एच. 44 0440) ही गाडी ताब्यात घेण्यात आली असून त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. स्विफ्ट गाडी पकडल्याचे पाठिमागील गाडीच्या चालकास निदर्शनास आल्यानंतर महिंद्रा गाडीच्या चालकाने गाडी घटनास्थळी सोडून पळ काढला. दुसर्या गाडीचा नंबर एम.एच. 17 ए.जे. 2217 एक्स यु व्ही 500 असा आहे. यातही गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या. या दोन्ही गाड्यांमध्ये 17 लाख 72 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी स्विफ्ट गाडीचा चालक शेख राजू (रा. सिरसाळा) याला ताब्यात घेतले तर महिंद्रा गाडीचा चालक शेख आसिप (रा. पात्रूड) हा मात्र फरार झाला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.