Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडबीडच्या आरटीओ कार्यालयात ‘पैसा फेक तमाशा देख’, वाहन चालकांसह मालकांची प्रचंड...

बीडच्या आरटीओ कार्यालयात ‘पैसा फेक तमाशा देख’, वाहन चालकांसह मालकांची प्रचंड अडवणूक, लायसेन्स, ऑनलाईन टॅक्ससाठी पैसे घेतले जातात


कार्यालयातील ट्रान्सपोर्ट सेक्शन बंद
तीन खासगी व्यक्तींद्वारे वसुली
आरटीओ माने औरंगाबादहून शेंगा हाणतात
विघ्नेंकडून नागरिकांसमोर विघ्नच विघ्न
बीड (रिपोर्टर) बीडच्या आरटीओ कार्यालयाचा कार्यभार सातत्याने रामभरोसे चालत असताना या कार्यालयाचा चार्ज औरंगाबादचे आरटीओ माने यांच्याकडे देण्यात आल्यापासून कार्यालयामध्ये पैसा फेका तमाशा बघा हा धंदा प्रचंड वाढला आहे. लायसेन, ऑनलाईन टॅक्स यासह अन्य कुठल्याही कामासाठी पैसे दिले तरच याठिकाणी काम होत असून अवैधरित्या पैसे घेण्यासाठी तीन खासगी व्यक्तींची येथे नियुक्ती केली गेल्याचेही सांगण्यात येते. ऑनलाईन टॅक्सच्या पावत्या भरण्यासाठी पैसे घेतले जातात. विघ्ने नावाच्या आरटीओकडून येणार्‍या प्रत्येक नागरिकाची अडवणूक होत असल्याची ओरडही सातत्याने होत असून कार्यालयातल्या वसुलीबाज मोहिमेला जिल्हाधिकारी आळा घालणार का? असा थेट सवाल आता वाहन चालक-मालकांकडून केला जात आहे.


बहुचर्चित परंतु आरटीओसह कर्मचार्‍यांमुळे कुप्रसिद्ध असलेल्या बीडच्या आरटीओ कार्यालयात सर्वसामान्य वाहनचालकांसह वाहन मालकांची प्रचंड अडवणूक होऊन आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. गाडी नावावर करायची असेल, टॅक्स क्लियर करायचा असेल, लायसेन काढायचे असेल अथवा भरलेल्या टॅक्सच्या पावत्या ऑनलाईन करायच्या असतील अथवा अन्य कुठलेही काम असेल त्यासाठी या कार्यालयात दोनशे रुपयांच्या कामासाठी दोन हजार ते पाच हजार रुपये अवैधरित्या द्यावे लागत आहेत. येथील आरटीओचा चार्ज हा औरंगाबाद येथील आरटीओ माने यांच्याकडे आहे. ते बीड कार्यालयात कधीही मिळून येत नाहीत. अन्य तीन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांनी काम करणे अपेक्षीत आहे. परंतु कुठल्याही कामासाठी माने साहेबांची ऑर्डर आणा, असे लिगली सांगितले जाते. मात्र दाम दुप्पटीने नेमलेल्या खासगी व्यक्तींकडे पैसे दिले की, एका चिठ्ठीवर काम होते. विघ्ने नावाचे सहाय्यक आरटीओ यांनी अक्षरश: सर्वसामान्य नागरिकां-समोर विघ्नांचा डोंगर उभा केल्याचेही वेळोवेळी पहावयास मिळत आहे. एकूणच बीडच्या आरटीओ कार्यालयात पैशाशिवाय कुठलेच काम होत नसल्याचे दिसून येत असून गेल्या आठ दिवसांपासून ट्रान्सपोर्ट सेक्शन बंद असल्याच्या तक्रारीही मिळून आल्या आहेत.

Most Popular

error: Content is protected !!