बीड (रिपोर्टर) गेल्या पंचेवीस वर्षांपासून आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करत आहोत. माझ्यासारखे अनेकजण शिवसेना टिकवण्यासाठी काम करतात, मात्र बीडला संपर्कप्रमुख म्हणून असलेले आनंद जाधव हे दलालीचे काम करतात. माजलगावमध्ये त्यांचे अवैध धंदे सुरू आहेत. ते शिवसैनिकांकडून पैशाची मागणी करतात. आम्ही त्यांच्या मागण्या पुर्ण केल्या नाहीत म्हणून मला पदापासून दूर रहावे लागले. शिवसेना आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेंसोबत आहोत. औरंगाबादचे संभाजीनगर हे नामकरण झाले. याच्यापेक्षा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पदावरून पायउतार झाल्याचा जास्त आनंद चंद्रकांत खैरे यांना झाला, असा आरोप करत संपर्कप्रमुखांनी माजलगावचे जिल्हाप्रमुखपद पैसे घेऊन दिल्याचा घणाघात सचीन मुळुक यांनी केला.
आज सकाळी शहरातील हॉटेल गोल्डन चॉईस येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी भाजपचे संदीप उबाळे, वैभव जाधव यांची उपस्थिती होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रत्येक शिवसैनिकाला आनंद झाला. मात्र आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आम्हा शिवसैनिकांना दुजाभावाची वागणूक दिली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये आले असता आम्ही महाविकास आघाडीत असतानाही आम्हाला त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली. हीच खदखद कार्यकर्त्यांपासून आमदारांपर्यंत होती ती खदखद एकनाथ शिंदेंच्या रुपाने बाहेर आली. हिंदुत्व शिवसेना आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेंसोबत आहोत. बीडमधील जवळपास 70 टक्के आजी-माजी पदाधिकारी आमच्या सोबत आहेत. ते लवकरच आमची भूमिका स्पष्ट करतील, असेही ते या वेळी म्हणाले. त्याचबरोबर शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव हे बीडमध्ये सेना वाढवण्यासाठी नव्हे तर दलाली करण्यासाठी येतात. माजलगावमध्ये अवैध धंद्यात त्यांची भागीदारी आहे. मी ती पुराव्यासह निष्पन्न करू शकतो, असेही सचीन मुळुक या वेळी म्हणाले.