बीड (रिपोर्टर): लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वेगवेगळ्या मतदारसंघात चाचपणीला सुरुवात केली आहे. इच्छुकांसोबत बोलत शरद पवारांची राष्ट्रवादी पुर्ण ताकतीने या निवडणुकीत उतरण्याचे मनसुबे आखत असून काल बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि इच्छुकांसोबत शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह अन्य नेत्णयांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत इच्छुकांना काही प्रश्न विचारले गेले, तर इच्छुकांनी आपले म्हणणे मांडत लोकसभा लढवण्याची तयारी दर्शविली.
काल राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपुर्ण बैठक झाली. या बैठकीला खा. श्रीनिवास पाटील, आ. एकनाथ खडसे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, प्राजक्ता तनपुरे, शशिकांत शिंदे, संदीप क्षीरसागर, हेमंत टकले, रविंद्र पवार, महेबूब शेख, रोहिणीताई खडसे, निरज महाकाळ यांच्यासह आदी मान्यवर या बैठकीला होते. या बैठकीमध्ये 2024 लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली. त्यामध्ये खासकरून बीड लोकसभेसाठी एक महत्वपुर्ण बैठक झाली. या बैठकीत आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह लोकसभा निवडणूक लढवू इच्छीणारे माजी खा. जयसिंगराव गायकवाड, बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रविकांत राठोड, सुशिलाताई मोराळे, नरेंद्र काळे, दरेकर नाना हे उपस्थित होते. बीड लोकसभा मतदारसंघ गेल्या तीन टर्म मुंडेंकडे आहे. बीड जिल्हा हा शरद पवारांसाठी सकारात्मक जिल्हा मानला जातो. मात्र मध्यंतरी राष्ट्रवादीत उभी फूट पडली. त्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी कशी असेल हे येणारा काळ सांगणार असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने बीड लोकसभा लढवण्यासाठी आतापासून तयारी सुरू ठेवली आहे.