बीड (रिपोर्टर): येत्या शनिवार दि. 13 जानेवारी रोजी बीड शहरातील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात ओबीसी आरक्षणासाठी महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले असून या महासभेला ओबीसीचे राष्ट्रीय नेते, बहुजन समाजाचे हृदयसम्राट, राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब मार्गदर्शन करणार आहेत. या महासभेची जोरदार तयारी पूर्णत्वाकडे आली असून बीड शहरात सर्वत्र ओबीसी समाजाचे ध्वज, बॅनर लागले आहेत. लाखोच्या संख्येने ओबीसी समाज या महाएल्गार सभेला उपस्थित राहणार असल्याने 13 जानेवारीला बीड शहर ओबीसीमय होणार आहे.
या महाएल्गार सभा मा.ना.छगनरावजी भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या महाएल्गार सभेचे स्वागताध्यक्ष महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष ड. सुभाष राऊत असून याप्रसंगी ना.धनंजय मुंडे, माजीमंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजीमंत्री महादेव जानकर, आ.गोपीचंद पडळकर, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे,आ. राजेश भैय्या राठोड, माजी आ. केशवराव आंधळे, माजी आ. नारायणजी मुंडे, ओबीसी जन्म मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. टी. पी. मुंडे, राष्ट्रीय विमुक्त गोमंतू आदिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव गायकवाड, बारा बलुतेदार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव दळे, मी वडार महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष विजय चौघुले, मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मणराव हाके, ओबीसी बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बी. डी. चव्हाण, भाजपा नेते सर्जेराव तांदळे, बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. पी. टी. चव्हाण, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजीराव राऊत, सेवालाल सेनेचे संस्थापक अध्यक्ष बी. एम. पवार, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांच्यासह अनेक मान्यवर नेते आणि ओबीसी समाजातील विविध जातींचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ओबीसी समाजाचा आणि ओबीसी समाजाचे नेते ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांचा मराठा आरक्षणाला कसलाही विरोध नसताना त्यांना टार्गेट केले जात आहे. ओबीसी समाज आणि भुजबळ साहेब यांची एवढीच मागणी आहे की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. मात्र तरीदेखील मुद्दामहून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात आहे. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वाद निर्माण करणार्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी ओबीसी समाजाचे हृदयसम्राट ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांची तोफ बीड शहरामध्ये येत्या 13 जानेवारीला कडाडणार आहे. या महाएल्गार सभेसाठी बीड जिल्ह्यातील गाव, वस्ती, तांडा, शहर आदी भागातून लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधव आणि भगिनी उपस्थित राहणार असून ओबीसी समाजाची महाशक्ती या महाएल्गार सभेच्या माध्यमातून दिसणार आहे. महाएल्गार सभेच्या अनुषंगाने बीड शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर ओबीसी समाजाचे ध्वज, स्वागत कमानी आणि बॅनर मान्यवरांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. बीड शहरात आणि जिल्ह्यात ठीकठिकाणी सभेसाठी येणार्या ओबीसी बांधवांकरिता नाश्ता, जेवण आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. या महाएल्गार सभेच्या माध्यमातून ना. छगनरावजी भुजबळ साहेब काय? बोलणार याकडे बीड जिल्ह्याचे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
चौकट
विविध ठिकाणी केली पार्किंगची व्यवस्था!
महाएल्गार सभेसाठी बीड जिल्ह्यासह इतर भागातून येणार्या ओबीसी बांधवांच्या वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून बीड शहरातील मल्टीपर्पज ग्राउंड छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, माने कॉम्प्लेक्स परिसर, स्मशानभूमी समोरील फटाका स्टॉलची जागा, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, सह्योग नगर भागात असलेले जुने गोदामची जागा अशा विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
चौकट
ओबीसी व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवावीत!
ओबीसी आरक्षणासाठी होणार्या महाएल्गार सभेच्या अनुषंगाने शनिवार दि. 13 जानेवारी रोजी बीड शहरातील ओबीसी बांधवांनी दुपारी दोन वाजल्याच्या नंतर आपली प्रतिष्ठाणे, दुकाने बंद ठेवून सभेसाठी उपस्थिती लावावी असे आवाहन बीड जिल्हा सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.