उर्दूच्या रिक्त जागांची माहिती जि.प.ने पोर्टलवर भरलीच नाही
बीड (रिपोर्टर): जिल्ह्यातील उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर त्याचा परिणाम होत आहे. रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी मागणी अशफाक इनामदार यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केल्यानंतर मुंडे यांनी याची दखल घेत काल तात्काळ जि.प.च्या सीईओंना जागा भरण्यासंदर्भात निर्देशित केले आहे.
2022-23 च्या प्राप्त संच मान्यतानुसार उर्दू प्राथमिकचे 57 व माध्यमिकच्या 7 जागा रिक्त आहेत. सदरील या रिक्त जागा भरल्या जात नाहीत. शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, शिक्षण अभियोगिता व बुद्धीमत्ता चाचणी झाल्यानंतर शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने पवित्र पोर्टल उपलब्ध करूएन दिले. राज्यात सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थात शिक्षकांच्या रिक्त जागांचा अहवाल पोर्टलवर नमूद करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. त्याची शेवटची तारीख 15 जानेवारी आहे, परंतु बीड जिल्हा परिषदेने आजपर्यंत उर्दू माध्यमिकाच्या प्राथमिक व माध्यमिकचे पदे रिक्त असतानाही त्याची माहिती पोर्टलवर अपलोड केली नाही व करतानाही दिसून येत नाही. काल पालकमंत्री धनंजय मुंडे बीड शहरामध्ये आले असता अशफाक इनामदार यांनी या बाबत त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांनी तात्काळ निर्देश दिले आहेत. या वर्षी जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळांवर शिक्षकांची नियुक्ती झाली नाही तर जिल्ह्यात उर्दू शाळा बंद पडतील, असा धोका निर्माण झाला आहे.











