पिण्याच्या पाण्यासह पार्किगचीही व्यवस्था
—————
गेवराई (रिपोर्टर) मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कुच करण्यासाठी मराठा बांधव सज्ज झाले आहेत. 20 जानेवारी रोजी सराटे अंतरवाली येथून मुंबईकडे निघणार्या या आंदोलन वारीतील मराठा बांधवांसाठी पहिल्याच दिवशीचे दुपारच्या जेवण कोळगाव याठिकाणी आहे. दरम्यान या भव्य अन्नदानासाठी कोळगावसह आजूबाजूच्या 50 गावातील नागरिकांनी हातभार लावण्याचा निश्चय केला असून ती मराठा बांधवांच्या सेवेसाठी दिवस रात्र एक करत आहेत. यामध्ये 20 ठिकाणी जेवणाचे स्टाँल, पिण्याच्या पाण्यासाठी जार, हात-पाय धुण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याचे टँकर उभी करण्यात येणार असून वाहनांच्या पार्किगसाठी देखील व्यवस्था कोळगाव येथील नागरिकांनी केली आहे.
मराठा व कुणबी एकच असून मराठा समाजाला ओबीसी मधून सरकसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागील अनेक वर्षापासून लढा देत आहेत. त्यांच्या या आंदोलनामुळे कधी नव्हे तो मराठा समाज एकवटला असून 20 जानेवारी रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे मोर्चा जात आहे. लाखों मराठा समाज बांधव मुंबईकडे आरक्षण मागणीसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून समाज बांधव या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सहभागी होणार आहेत.दरम्यान या मोर्चातील मराठा बांधवांसाठी राष्ट्रीय महामार्गावर असणार्या कोळगाव येथे पहिल्या दिवशी दुपारचे नियोजन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर कोळगाव येथील अन्नदानासाठी परिसरातील गावांनी हातभार लावून मराठा बांधवांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते. तरी या आवाहनाला कोळगाव परिसरातील 50 गावांतील नागरीकांनी हातभार लावण्याची तयारी दर्शवली आहे. कोळगावसह परिसरातील गावात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ग्रामस्थांनी बैठक घेऊन नियोजन करण्यास सुरुवात केली असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. कोळगाव व परिसरातील 50 गावातील तरुण, ग्रामस्थ अन्नदानासाठी सज्ज झाले असून कोळगाव याठिकाणी जेवणाचा महायज्ञ पार पडणार आहे. या गावातील स्वयंसेवक देखील नियुक्त करुन त्यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदारी देण्यात आल्या आहेत.
चौकट –
——————-
स्वयंसेवकांची नियुक्ती, जबाबदारी यशस्वी पार पाडणार
——————-
कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मोर्चात सहभागी होणार्या मराठा बांधवांसाठी पहिल्याच दिवशी दुपारी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 20 ठिकाणी जेवणाचे स्टाँल राहणार असून यामध्ये पुरी, ठेचा, खिचडी, भाकरी, बेसन, उपमा, शिरा, भाजी अशी सोय राहणार आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी बिसलरी, जार, हात-पाय धुण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याचे टँकर उभी करण्यात येणार असून वाहनांच्या पार्किगसाठी देखील व्यवस्था कोळगाव येथील नागरिकांनी केली आहे. यासाठी परिसरातील गावातील शेकडो स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून हि जबाबदारी यशस्वी पार पाडण्यासाठी स्वयंसेवक सज्ज झाले आहेत.











